पुसेगाव :
गेल्या वर्षी सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवले होते. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. नागरिकांनी प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे’, असे मत आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
काटेवाडी येथील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, डॉ. माधुरी पवार, विस्ताराधिकारी एल.जे. चव्हाण, तलाठी गणेश बोबडे, सरपंच बाळासाहेब जगदाळे, उपसरपंच विकास पांडेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते पृथ्वीराज पांडेकर, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, सुसेन जाधव उपस्थित होते.
या आठवड्यात काटेवाडीत २९ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी काटेवाडीत आढावा बैठक घेऊन ग्रामस्थांना धीर दिला. मतदारसंघात पहिला रुग्ण आढळल्यापासून त्याच्या निवासस्थानी भेट देण्यापासून परिसर निर्जंतुक करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्राला भेट, टप्प्याटप्प्याने यंत्रणा वाढविणे, कोरोना सेंटरमध्ये जाऊन बाधितांसाठी योगाचे धडे आमदार महेश शिंदे यांनी दिले.
फोटो केशव जाधव यांनी पाठविला आहे.
काटेवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत आमदार महेश शिंदे यांनी परिस्थितीची माहिती घेतली. (छाया : केशव जाधव)