सातारा : ‘आतापर्यंतचे लेखन हे देशातील घराणेशाहीविरोधात झालेले आहे. त्यास छेद देऊन संविधानाच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी सर्व बहुजन, वंचित, अठरा आलुतेदार व बारा बलुतेदारांनी एकत्रित येणे काळाची गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे संस्थापक तथा संविधान लोकजागर परिषदेचे संघटक अनिल वीर व समितीचे अध्यक्ष अॅड. हौसेराव धुमाळ यांना साहित्यिक डॉ. प्रा. सुभाष वाघमारे यांनी संविधानाच्या स्वप्नातील गाव या कवितासंग्रहाची भेट दिली. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामराव बनसोडे होते.
डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, ‘देशात एकमेव निर्मिती करणारा काव्यसंग्रह आहे. संविधान आधारित स्वप्नातील गाव निर्माण करण्याची संकल्पना आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिले पाहिजे. अन्याय-अत्याचार हे पाहिल्याने संविधानाच्या माध्यमातून गावोगावी जागृत झाले पाहिजे.’
अनिल वीर म्हणाले, ‘ओतप्रोत वाणी व अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे विशाल दृष्टिकोन ठेवणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. जे मनात आहे. तेच बिनधास्तपणे मांडत असतात. अर्थात, मनात एक व ओठावर एक असे असता कामा नये. खरोखरच, सर्वांगसुंदर समाज निर्माण करण्यासाठी संविधानावरच वाटचाल करावी. प्रारंभी, शासन/प्रशासनाच्या निदर्शनास येण्यासाठी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान न करता निवेदन, निदर्शने व आंदोलन ठीक आहेत.
शाहीर माधव भोसले व जे. डी. कांबळे यांनी स्वागत केले. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.