सातारा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने ३० दिवसांचा वेळ मागितला. पण, आपण ४० दिवस दिले. आता मराठा समाज आरक्षणाचे हे पहिले आणि शेवटचे आंदोलन आहे. राज्यात आणि देशातही मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवणारी एकही शक्ती नाही. कारण, मराठा समाज छाताडावर बसून आरक्षण घेईल. शासनाला आता सुट्टी नाही,’ असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. फलटण येथे मराठा आरक्षण संदर्भात आयोजित सभेत जरांगे-पाटील बोलत होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. रात्री दहाच्या सुमारास ही सभा संपली.
मनोज जरांगे म्हणाले, ‘मराठा समाजाची दोन अंगे आहेत. मराठा क्षत्रीय असून त्याला लढायचं कसं ते माहीत आहे. तसेच शेती करुनही तो देशाला अन्न पुरवतो. आज मराठा समाज राज्यात सर्वत्र असून त्यांचं रक्ताचं नातं आहे. मराठा समाजाला सर्व निकषात बसूनही आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आरक्षणाचा हा लढा ताकदीने लढायचा आहे. त्याचबरोबर पाच हजार पानांचा पुरावा मिळाला असून सरकारनेही वळवळ न करता आरक्षण द्यावे.
मराठा आणि कुणबी एक आहेत. त्यांनी कधी जात पाहिली नाही. पक्ष आणि नेतेही मोठे केले, असे सांगून जरांगे-पाटील पुढे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षणाची पुन्हा संधी नाही. या संधीचे सोने करुया. पहिला आणि शेवटचा लढा आहे. आपल्यात फूट पडू न देता आरक्षणाचे पुण्य पदरात पाडून घेऊया. कारण, सरकारने वेळ मागून घेतल्याने ते कोंडीत आहेत. तर आपली कसोटी सुरू आहे. महाराष्ट्रातील ही लाट उसळली असून अनेक पिढ्यांची खदखद बाहेर पडली आहे.
२२ ऑक्टोबरला पुढील दिशा... मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाकडे चार दिवस आहेत. त्यांनी त्यापूर्वी आरक्षण द्यावे. नाहीतर २२ आॅक्टोबरला आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार आहे. अंधारात नाही तर मराठा समाजाला बरोबर घेऊन निर्णय घेणार, आंदोलन कसे करायचे हे ठरविणार, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी या सभेतून दिला.
जरांगे -पाटील यांनी दिलेले सल्ले...- मराठा समाजाची टीम तयार करुन गावांगावात जागृती करा.- आंदोलन शांततेत करा. जाळपोळ आणि उद्रेक अजिबात करु नका.- आरक्षणासाठी आत्महत्या करु नका. तरुणांनी आत्महत्या केली तर आरक्षण कुणासाठी मागायचे.- पहिला आणि शेवटचा लढा. आपल्यात मतभेद होऊ देऊ नका.