सातारा : पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची वेळ आली तरी यंदा मनोमिलन होईल की नाही, याची दाट शंका आहे. त्यामुळे मनोमिलनाची वाट न पाहता कार्यकर्ते कामाला लागले असून, ते स्वत: उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, रविवारी दिवसभर विविध ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून साताऱ्यात केवळ मनोमिलनाचीच चर्चा सुरू आहे. आता तर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली आहे. मात्र, खासदार उदयनराजेंकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा लावला आहे. ‘काम सुरू करा,’ असा आदेश नेत्यांकडून मिळाल्याचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत. जसजसा अर्ज भरण्याचा दिवस जवळ आला, तशी मनोमिलनाबाबत सातारकरांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. रविवारीही दिवसभर उदयनराजेंच्या निरोपाची म्हणे वाट पाहण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी अजिंक्यतारा कारखाना, सुरुची बंगला आणि साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये मुलाखती घेतल्या. दरम्यान, आज, सोमवारी पहिल्या दिवशी ‘नाविआ’कडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार, याची उत्सुकता लागली आहे. खासदार उदयनराजे भोसले आज सकाळी साताऱ्यात आल्यानंतर मनोमिलनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ होत आहे. (प्रतिनिधी) उमेदवारांना पोलिस संरक्षण सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. आवेदने सादर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून इच्छुक उमेदवारांना त्यांच्या कार्यालय किंवा निवासस्थानापासून मागणीनुसार पोलिस संरक्षण विनामूल्य पुरविले जाईल, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली आहे. मात्र, पोलिसांना या संरक्षणाबाबत आगावू सूचना देणे गरजेचे आहे
मनोमिलनाचं बघू..
By admin | Published: October 24, 2016 12:32 AM