कऱ्हाड : राज्यभरातील तदर्थ वैद्यकीय अधिकारी ‘कार्यमुक्ती’च्या विरोधात लोकप्रतिनिधींचे दरवाजे ठोठावत असतानाच, आरोग्य विभागाने त्यांच्यावर ‘लेटरबॉम्ब’ टाकण्यास सुरुवात केली आहे. गत आठ दिवसात जिल्हा परिषदांच्या माध्यमातून सुमारे पंधरा टक्के तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा समाप्तीचा आदेश पाठविण्यात आला असून इतर सर्वच अधिकारी सध्या सेवा समाप्तीच्या जात्यात आहेत.
कोरोना काळात ग्रामीण भागामध्ये जिवापाड मेहनत घेतलेल्या कंत्राटी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नोकरीवर सध्या टांगती तलवार आहे. वेळेवर मानधन मिळत नसतानाही गत दोन वर्षांपासून कंत्राटी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत आहेत. कागदोपत्री राज्यभरात या अधिकाऱ्यांची संख्या ८३५ असली तरी, प्रत्यक्षात ही संख्या १ हजार २०० पेक्षा जास्त आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासह रुग्णसेवेमध्ये या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. मात्र, तरीही सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस अर्हताधारकांची नेमणूक करून, कंत्राटी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.
याविरोधात तदर्थ वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. अभिषेक ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय साळुंखे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मंगेश खबाले यांच्यासह इतर पंधरा जिल्ह्यांतील पदाधिकारी स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दरवाजे ठोठावत आहेत. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये, अशी मागणी करीत आहेत. मात्र, एकीकडे हा लढा सुरू असतानाच दुसरीकडे आरोग्य विभाग जिल्हा परिषदांच्या माध्यमातून त्यांच्या अखत्यारीतील आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्याचे आदेश पाठवित आहे.
सध्या वीस टक्क्यांहून जास्त अधिकाऱ्यांना असे आदेश प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी एमबीबीएस अर्हताधारकांची नेमणूकही करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच बीएएमएस अर्हताधारकांच्या पुनर्नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांचे भवितव्य अंध:कारमय बनले आहे.
- चौकट
एमबीबीएस डॉक्टरही वर्षासाठी
नव्याने नेमणूक करण्यात येत असलेल्या बंधपत्रित एमबीबीएस अर्हताधारकाची नियुक्ती ही एक वर्षासाठी असणार आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणसाठी शासकीय बंधपत्र सक्तीचे असते. त्यामुळेच बहुतांश एमबीबीएस अर्हताधारक पदस्थापना स्वीकारतात.
- चौकट
बीएएमएस डॉक्टर म्हणतात...
१) एमबीबीएस अधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती द्या.
२) नवीन पदनिर्मितीसाठी आवश्यक शासननिर्णय करा.
३) बीएएमएस अधिकाऱ्यांना गट ब पदस्थापनेवर नियुक्ती द्या.
४) समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करा.
- चौकट
दर्जा समकक्ष; पण वेतनात तफावत
राज्य शासनाच्या २६ मे १९८१ च्या शासन निर्णयानुसार आयुर्वेद बीएएमएस चिकित्सक व ॲलोपॅथी एमबीबीएस चिकित्सक यांना समकक्ष दर्जा आहे. वेतन आणि इतर समान धोरण लागू करण्यात आले आहे. मात्र, तरीही एमबीबीएस व बीएएमएस यांच्या मानधनात तफावत आहे.
- चौकट
कार्यमुक्त केलेले डॉक्टर...
अमरावती : १५
बुलडाणा : ४
नागपूर : ८
नांदेड : १४
नाशिक : १
औरंगाबाद : ६
यवतमाळ : ६
सातारा : ६