फलटण , दि. २७ : साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली आहे. परंतु तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आळी मिळी गुप चिळीची भूमिका घेणे पसंत केले आहे. यंदा उसाचा पहिला हप्ता किती दिला जाणार? दराबाबत चारपैकी एकाही साखर कारखान्याकडून वाच्यता होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
फलटण तालुक्यात एक सहकारी आणि तीन खासगी कारखाने आहेत. यावेळी चारही कारखान्यांत दराबाबत स्पर्धा असेल; पण नीरा खोऱ्यातील इतर कारखान्यातही तालुक्यातील ऊस जातो. त्यामुळे इतर कारखाने काय दर देतात, याबाबत सर्वजण लक्ष ठेवून आहेत.राज्यात ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाही, अशी गर्जना करणाऱ्या शेतकरी संघटनांची ही केवळ वल्गना ठरतेय की काय, अशी परिस्थिती दिसत आहे.
मंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांबद्दल खरोखरच आस्था आहे की, एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी व आपली ताकद दाखविण्यासाठी आमचा वापर केला जाता आहे, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. दोघेही यंदा उसाचा पहिला हप्ता किंवा उसाचा दर किती दिला पाहिजे, हे जाहीर करीत नसल्याचे शेतकऱ्यांना स्पष्ट दिसत आहे.
सरकारने १ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यासाठी परवागनी देऊन यंदा साडेनऊ टक्के साखर उताऱ्यांस २ हजार ५५० एफआरपी जाहीर केली आहे. त्यामुळे पहिला हप्ता किमान त्यापेक्षा अधिक मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
अनेक कारखाने नियमाप्रमाणे एफआरपी देऊन मोकळे होतात. नंतर वाढीव दर देत नाहीत म्हणून शेतकरी संघटना एकाच वेळी उसाचा दर ठरवून मागत आहेत. परंतु कारखानदारांकडून कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. हे शेतकऱ्यांना अस्वस्थ करत आहे. दरांची कोंडी कोणता साखर कारखानदार फोडणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकरी संघटनेची भूमिकाही महत्त्वाचीऊसदर जाहीर होईल; पण तो दर साखर कारखानदार देणार का? असाही नंतर वादाचा मुद्दा असणार आहे. कारखान्याकडून दर पंधरवड्याचे ऊस बिल त्यांच्या पुढील आठवड्यानंतर दिले जाते. त्यामुळे १ नोंव्हेबरला कारखाने सुरू झाले तर २१ नोव्हेबरपर्यंत पहिला हप्ता किती द्यायचा, हे ठरवता येणार आहे. कदाचित त्यामुळे शेतकरी संघटना काय भूमिका घेते? हे पाहून हप्त्याचे पाहू या विचारातून कारखान्याच्या गोटातून शांतता पाहायला मिळते.