सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे दाणादाण उडाली असून दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ते, पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे वाहतूक बंद झाली आहे. तर सततच्या पावसामुळे काेयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचलाय. त्यामुळे दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. कण्हेर धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला तब्बल ३०७ मिलीमीटर झाला आहे.सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात सहा दिवसांपासून तुफान पाऊस पडत आहे. लोकांना घराबाहेर पडता येत नाही. तसेच इतर गावांशीही संपर्क कमी झाला आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १६३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे २३७ आणि महाबळेश्वरला ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.महाबळेश्वरचा हा पाऊस या वर्षातील २४ तासांमधील उच्चांकी ठरला आहे. तर जोरदार पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ७५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७५.२६ टीएमसीवर पोहोचला. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू असून त्यातून एक हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे १० हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
कण्हेरमधून पाणी सोडले; नदीकाठी सतर्कतेचा इशारा..सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यातच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उचलून ५ हजार क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाटण तालुक्यात पुलावरुन पाणी; रस्ता बंद..पाटण तालुक्यातही धुवाॅंधार पाऊस होत आहे. यामुळे गोकुळ तर्फ पाटण या ठिकाणी कोयना नदीवर असलेल्या पुलावरुन पाणी जात आहे. परिणामी सुरक्षिततेच्यादृष्टीने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पोलिस बंदोबस्तही तैनात आहे.