जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मित्राशी गप्पा मारत असताना जखमी अवस्थेतील कोकिळा जमिनीवर पडली... तिला पाहून त्यांचा जीवही कळवळला... सोडून जावं तर पशुपक्षी लचके तोडतील म्हणून तिला घरी नेलं... उपचार केलं, खाऊ-पिऊ घातलं अन् कोकिळेला या कुटुंबाचा लळाच लागला. तिला बाहेर सोडलं तरी घरातच येतीय. सध्या ती घरात मोकळी वावरतेय.‘गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परीस मेंढरं बरी...’ हे गाणं सर्वांनाच आठवत असेल. हे गाणं किती खरं आहे, याचं उदाहरण वाईमध्ये अनुभवास मिळत आहे. वाईमधील मल्लखांब व जिमनॅस्टिक प्रशिक्षक विठ्ठल गोळे हे गुरुवारी मित्रांना सोडण्यासाठी वाई येथील बसस्थानकात गेले होते. त्याठिकाणी दुचाकीशेजारी उभारून मित्राशी गप्पा मारत असतानाच त्यांच्या गाडीजवळ घाबरलेल्या अवस्थेत असलेली कोकिळा जमिनीवर पडली. तिच्या पाठीवर जखम झाली होती. तिला उडता येत नव्हतं. तिला पाहून गोळे यांचे मन हेलावलं. तिला सोडून द्यावं तर बसस्थानक परिसरातील पशुपक्षी मारून टाकतील. त्यामुळे गोळे यांनी तिला घरी नेण्याचा निर्णय घेतला. कोकिळेला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले; पण दवाखाना बंद होता. त्यामुळे घरीच उपचार करून तांदूळ खाऊ घातले. पाणी पाजले. खोक्यात मऊ व ऊबदार करून त्याला रात्रभर ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा खाऊ-पिऊ घालून घराच्या गॅलरीतून बाहेर सोडले; पण ती उडून जाण्यास तयार नव्हती. कितीही सोडलं तरी पुन्हा उडून घरात येत आहे. मग काय, घरातच खुल्या वातावरणात तिला सोडलं. दारे-खिडक्या सताड उघडे ठेवले. तिच्या मनात आल्यावर चट उडून जाईल, असा विचार केला. पण ती मनसोक्त फिरत आहे. मुलींशी जडली गट्टीउपचार केलेल्या कोकिळा घरातून जाण्यास तयार नाही. तिला कसल्याही पिंजऱ्यात न ठेवताही घरातच वावरत आहे. विठ्ठल गोळे यांच्या मुली निर्मिती व हिंदवी यांच्याशी कोकिळेशी चांगली गट्टी जमली आहे. कोकिळेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तिला कितीही सोडून देण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही. आणखी एक-दोन दिवस वाट पाहून वनविभागाच्या ताब्यात देणार आहोत.- विठ्ठल गोळे, वाई
कोकिळेला लागलाय प्राणदात्याचा लळा..!
By admin | Published: July 16, 2017 12:08 AM