सातारा : कोणतेही ठोस कारण नसताना नारायण नामदेव पिसाळ (वय ६२, रा. शेरे शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा खून केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ राजेंद्र नामदेव पिसाळ (वय ५१) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, २२ आॅक्टोबर २०१५ रोजी सकाळी सहाच्या सुमारास अचानक राजेंद्र पिसाळ याने भाऊ नारायण पिसाळ यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच हातातील सुरा नामदेव पिसाळ यांच्या पोटात दोन वेळा खुपसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मात्र, हा वाद सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या भरत पिसाळ, रोहीणी पिसाळ यांच्या पोटात आणि पाठीत सुरा भोसकून त्यांचा खून करण्याचा त्याने प्रयत्न केला. या घटनेमुळे फलटण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. के.शिंगटे यांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने राजेंद्र पिसाळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोन साक्षीदार भरत पिसाळ आणि रोहीणी पिसाळ यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी राजेंद्र पिसाळ याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस कॉन्स्टेबल मुस्ताक शेख, अमीत भरते यांनी सहकार्य केले.