कऱ्हाड : पत्नी आणि सासूसोबत असलेल्या वादाच्या कारणावरून सात वर्षीय मेहुण्याचा पायरीवर आपटून खून केल्याप्रकरणी जावयाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्या. अण्णासाहेब पाटील यांनी सोमवारी हा निकाल दिला.
सागर शंकर जाधव (रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत राहणारा रणजीत उर्फ निरंजन पवार (वय ७) हा मुलगा १० आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी बेपत्ता झाला होता. रात्री सात वाजेपर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याची आई अनिता पवार यांनी त्याचा शोध सुरू केला. दांगट वस्तीत सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अनिता पवार यांची विवाहित मुलगी सोनाली ही रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी आली. तिनेही रणजीतचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. शोधाशोध सुरू असतानाच रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डोंगरालगत असलेल्या वस्तीच्या संरक्षक भिंतीशेजारी रणजीत जखमी अवस्थेत आढळून आला. नागरीकांनी त्याला कृष्ण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत अनिता पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कºहाड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता सागर जाधव याने पत्नी सोनाली व सासू अनिता यांच्यासोबत असलेल्या वादाच्या कारणावरून मेहूणा रणजीतचा पायरीवर डोके आपटून खून केल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी अकरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. एल. शिरोळे यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्या. अण्णासाहेब पाटील यांनी आरोपीला गुन्ह्यात दोषी धरले. त्याला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षाला हवालदार एस. व्ही. खिलारे, ए. के. मदने यांनी सहकार्य केले.