वडूज : कटगूण ता. खटाव येथील एका फार्म हाऊसवर वृद्ध महिलेचा खून प्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेप शिक्षा सुनावली. सुनिलकुमार गणपत गौड (वय ३०, उत्तर प्रदेश राज्यातील रा. छोटी ईसीपूर, पोस्ट- ढेलाई जिल्हा प्रतापगड) असे या शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी गौड याने वृद्ध महिलेचा खून करुन २० हजार रूपयेची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी त्याला अटक केली होती.याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील कटगूण ता. खटाव येथे २०१४ साली श्रीमती सुमन प्रल्हादराव विधाते (वय ६३) यांच्यावर सुनिलकुमार गौड याने कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून करून रोख रक्कम २० हजार रूपये चोरून नेले होते. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हयाचा तपास स.पो .नी.आर.एस. सावंत्रे यांनी केला होता. त्यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून वैद्यकीय पुरावे गोळा केले. गुन्हयातील आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. सदर घटनेचा अधिक तपास करून आरोपीविरूद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल केले.साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सातारा: कटगूण येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 12:45 PM