प्रगती जाधव - पाटील ।सातारा : सोशल मीडियावरील चॅलेंज स्वीकारणाऱ्यांचंही अवस्था सध्या सहन होईना; सांगताही येईना, अशी झालीये. साहस दाखविण्यासाठी सोशल मीडियावरील चॅलेंज विनाकारण स्वीकारायचं अन् त्यातून सहन न होणारी दुखापत करून घ्यायची, असा भयानक ह्यट्रेंडह्णचं सध्या तरुणाईमध्ये आहे. स्कल ब्रेकर चॅलेंज हे त्यापैकीच एक याड. या चॅलेंजनं अनेकांना दुखापत झालीय; पण पुढच्यास ठेच लागूनही मागचा शहाणा होईना. परदेशातील हे खूळ आता सातारा, सांगलीतल्या ग्रामीण भागातही पोहोचलंय, हे दुर्दैव.
सोशल मीडियावर आपण साहसी आहोत, हे दाखवण्याचे परिमाण आता भलतेच बदलू लागले आहेत. साहस दाखवण्याच्या नादात स्वत:च्या जीवाशी खेळ करणाऱ्या तरुणाईला आता स्कल ब्रेकर चॅलेंजचं भलतंच याड लागलंय. परदेशात सुरू असणारं हे चॅलेंज आता सांगलीपर्यंत पोहोचलं आहे. छोटे व्हिडिओ तयार करण्याचे व्यासपीठ म्हणून टिकटॉक अनेकांसाठी अर्थाजनाचे साधन ठरले. मात्र, काहीवेळा त्याद्वारे विचित्र गोष्टी देखील व्हायरल होत आहेत. टिकटॉकमध्ये सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झाला जो पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. ह्यस्कल ब्रेकर चॅलेंज नावाचे आव्हान खूप वेगवान पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांच्या क्रेझचा भाग बनत आहे. या चॅलेंजमध्ये ह्यस्कल अर्थात डोके फुटण्याची किंवा प्राणघातक दुखापत होण्याची शक्यता असते. या प्रकारापासून पालक, विद्यार्थ्यांनीही सावध राहणे गरजेचे आहे.कुठून झाली सुरुवात?स्कल ब्रेकर चॅलेंजला स्पेनमध्ये सुरुवात झाली, जिथे शाळेतल्या दोन मुलींनी या चॅलेंजचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेच लोक जखमी झाले आहेत.
काय आहे स्कल ब्रेकर चॅलेंज?हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तीन लोक आवश्यक आहेत. ते परस्परांच्या शेजारी उभे राहतात. एक मध्यभागी उभा असतो आणि इतर दोन त्याच्या शेजारी उभे राहतात. पहिल्यांदा बाजूला उभे असलेले दोघे उडी मारतात. यानंतर, मध्यभागी उभा असलेल्याला उडी मारायला सांगितलं जातं. मध्यभागी उडी मारताच दोन्ही बाजूंनी उभे असलेले दोघे त्याच्या पायावर लाथ मारतात. यामुळे तो पाठीवर जमिनीवर पडतो. यावेळी, त्याच्या डोक्याला आणि मानांना गंभीर दुखापत होते.
मीडियाचा अतिवापर, पिअर प्रेशरची अन् अनियंत्रित सोशल मीडिया सध्या सर्वाधिक धोक्याचे आहेत. याबरोबरच स्वत:च्या कृत्याची जबाबदारी घेण्याची सवय न लावणं अन् दुसऱ्याच्या छळात आनंद घेण्याची वृत्ती वाढल्याने असे डेअर खेळण्याची वृत्ती मुलांमध्ये वाढत आहे.- डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ, सातारा