कुकुडवाड : विरळी-झरे रस्त्यावरील विरळी येथील ओढ्यावरील पूल पावसाच्या पाण्याने तुटला असल्यामुळे पुलाची दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या पुलावरून ये-जा करताना वाहनचालकांना, शाळकरी मुलांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने दुरवस्था झालेल्या या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी, पालक आणि नागरिकांतून होत आहे.विरळी -झरे हा रस्ता सातारा व सांगली या दोन जिल्ह्यांच्या मधील दुवा असून, तीर्थक्षेत्र गोंदवलेकर महाराज गोंदवले बुद्रुक या ठिकाणी जाणारा जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावरून भाविकांच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर जातात. तसेच पुलापासून काही मीटर अंतरावर विरळी हायस्कूल असल्याने बागलवाडी, कोरेवाडी, आटपाडकरवस्ती येथून विद्यार्थी सायकलवरून शाळेला येतात.
पावसाच्या पाण्यामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पूल बऱ्याच ठिकाणी खचला आहे. या ठिकाणी पुलाची दुरवस्था झाल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे केंद्र ठरत असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाच्या ठिकाणचा अर्धा रस्ता खचून गेला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाची व पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीबाबत तत्काळ उपाययोजना करावी. तसेच पुलाच्या खाली असणाऱ्या नलिकांच्या संख्या वाढवून चांगल्या दर्जाचा पूल तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.