सातारा : पाणी ही माणसाची प्राथमिक गरज असल्यामुळेच त्याला ‘जीवन’ म्हटले गेले आहे. जगण्यासाठी आत्यंतिक गरजेचे हे पाणी मिळवण्यासाठी मात्र अनेकांना जीवही धोक्यात घालावा लागतो. हीच हतबलता महामार्गालगत असलेल्या झोपडपट्टीतील मुलींमध्ये आढळून आली आहे. कळशीभर पाण्यासाठी त्या रोज जीव धोक्यात घालत आहेत. वाढे फाटा ते शिवराज चौक असा महामार्ग शहराजवळून गेला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असतो. आता या रस्त्याचे सहापदरीकरण झाल्यामुळे तो ओलांडणे केवळ भुयारी मार्गाने किंवा उड्डाणपुलावरूनच शक्य होणार आहे. अजस्र वाहनांच्या प्रचंड वेगासमोर आलेल्या व्यक्तीच्या क्षणार्धात ठिकऱ्या उडतील हे माहीत असूनही काही जणांना मात्र हा धोका दररोज पत्करावा लागतो आहे.महामार्गावर अजंठा चौकानजीक झोपड्या वाढल्या आहेत. तेथील लहानग्या मुलींना कळशीभर पाण्यासाठी दररोज महामार्ग धोकादायक रीतीने ओलांडून जावे लागत आहे. झोपडपट्टीत पाण्याची व्यवस्था नसल्याने या मुली पाण्याने भरलेली कळशी किंवा हंडा डोक्यावर घेऊन जिवाची पर्वा न करता महामार्ग ओलांडत असून, हे भयावह दृश्य एखाद्या दिवशी अपघाताला निमंत्रण देऊ शकते. अजंठा चौकात वाढत असणाऱ्या झोपडपट्टीतील काही मुली पाण्यासाठी महामार्ग ओलांडून पलीकडे जातात. महामार्ग सोडल्यावर दोनशे मीटर अंतरावर एक कूपनलिका आहे. तिथे घागरी भरून या ओझ्यासह पुन्हा महामार्ग ओलांडतात. अनेकदा त्यांना वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नाही. मग त्यांची धावाधाव होते. वेगवान वाहनाचे ब्रेक लागले नाहीत, तर अनर्थ ओढवू शकतो.यावर्षी पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यात सर्वत्र गडद होत आहे. शहरांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणीकपात केली जात आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे पाणीपुरवठ्याची मूलभूत सुविधा उपलब्धच नाही, नळाचे कनेक्शन नाही, त्यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष जाणे दुरापास्तच आहे. तथापि, महामार्गावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे या चिमुकल्यांच्या कसरतीकडे लक्ष जाणार का, असा विचार हे दृष्य पाहणाऱ्याच्या मनात आल्याखेरीज राहत नाही. (प्रतिनिधी) गरजा पुरवणाऱ्यांच्या गरजा दुर्लक्षितशहरात श्रमाची गरज मोठ्या प्रमाणावर असते. ती पुरवण्यासाठी दूरदूरचे लोक शहरानजीक वस्ती करून राहतात आणि झोपडपट्ट्या वाढत जातात. मर्यादित उत्पन्नगटाच्या कुटुंबांना स्वस्त वस्तूंची गरज भासते. ही गरजही याच झोपड्यांमधील लोक पुरवतात. श्रम आणि स्वस्त वस्तू विकून पोटाची खळगी भरणाऱ्या या गोरगरिबांना मात्र प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. त्यांच्या झोपड्या ‘अनधिकृत’ असतात, हे सर्वज्ञात आहे; परंतु त्या ‘विनाकारण’ उभ्या राहिलेल्या नाहीत, एवढे तरी मान्य करावेच लागते. झोपड्यांमधील स्त्री-पुरुष कामासाठी दिवसभर बाहेर राहतात आणि पाणी आणण्यासारखी कामे घरातील लहान मुले-मुलीच करतात. प्राथमिक गरजेसाठी लहानग्यांचा जीव धोक्यात घातला जाणे भयावह आहे.
‘जीवना’साठी जीव धोक्यात
By admin | Published: December 06, 2015 10:45 PM