ढेबेवाडी येथील बसस्थानक परिसर लोकवस्तीने वेढला आहे. याठिकाणी नेहमीच ग्रामस्थांचा राबता असतो. पाटण आणि कऱ्हाड आगाराच्या काही एसटी येथे संध्याकाळी मुक्कामी असतात. या परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. येथे येणारा प्रवासी किंवा वाटसरू नाक मुठीत घेऊन वावरत असतो. कोणीही याठिकाणी कचरा टाकत असतो. या परिसरात एसटीचे वाहक-चालक आणि कंट्रोलर जेवण करून रात्री आराम करतात. दिवसभर खटारा झालेल्या एसटीचे स्टेअरिंग ओढून चालकांचा जीव मेटाकुटीस येतो. त्यामुळे दुर्गंधीतही ते नाइलाजास्तव आराम करतात. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे डिझेल आणि इतर वस्तूंवर डल्ला मारतात.
वास्तविक, या बसास्थानकासाठी वेळोवेळी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्थानकाच्या परिसरातील डांबरीकरण, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, दिवाबत्तीची सोय, रंगरंगोटी आदी कामे करण्यात आली आहेत. मात्र, या कामांचे ऑडिट झाले का? ठेकेदारांनी केलेली कामे योग्य आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. भरमसाठ पैसा खर्च करूनही बसस्थानकाची अवस्था बकाल झाली आहे. अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. लाखो रुपये खर्च करून डागडुजी केलेल्या बसस्थानकाची देखरेखीविना दुरवस्था झाली आहे. बसस्थानकाच्या खांबांवर घातलेले बल्ब चोरून नेले जातात किंवा अज्ञातांकडून फोडून टाकले जातात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षक असणे गरजेचे बनले आहे.
- चौकट
दिवे बसविले; पण सुरक्षारक्षकांची गरज!
ढेबेवाडी बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटीतून डिझेल चोरण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यानंतर व्यवस्थापनाने येथील खांबांवर दिवे बसविले. त्यापूर्वी बसस्थानकात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असायचे. सुरक्षारक्षक नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती होती. दिवे बसविल्याने काही प्रामणात दिलासा मिळाला असला तरी सुरक्षारक्षकांची नेमणूक होणे गरजेचे आहे.