सातारा : सातारा शहर प्रकाशमान करण्याचे उद्दिष्ट सत्ताधारी सातारा विकास आघाडीने ठेवले आहे. या उद्दिष्टाच्या पहिल्या टप्प्यात शहरात पाच ठिकाणी पथदिव्यांचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार, दि. १४ रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी हद्दवाढीतील रहिवास क्षेत्रांना पायाभूत सुविधा देण्याच्या सूचना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिल्या होत्या. शाहूनगर विलासपूर, करंजे तसेच खेड ग्रामपंचायत या क्षेत्रातील काही भागांना तब्बल चार दशके विजेची सोय नव्हती. मोळाचा ओढा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या रुंदीकरणासह चौकाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र, ते काम अपूर्णच राहिले. हद्दवाढीच्या घोषणेनंतर सातारा पालिकेने जनरल फंडातून पन्नास लाख रुपये खर्च टाकून पथदिव्यांचे काम पूर्ण केले. हे पथदिवे आता मंगळवारपासून उजळणार आहेत.
अजिंक्यतारा चौक शाहूनगर, मराठा पॅलेस चौक इंदिरानगर, अजंठा चौक गोडोली, बॉम्बे रेस्टॉरंट चौक व मोळाचा ओढा येथे पथदिव्यांच्या कामाचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी सात वाजता होणार आहे. या भागात आजवर विजेची सोय कधीच झाली नाही. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. चेन स्नॅचिंग, अपघात अशा घटनांही येथे घडत होत्या. अशा सर्व प्रकारांचा आता आळा बसणार आहे. हद्दवाढीत आलेल्या भागात पायाभूत सुविधांची उभारणी सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लोगो : सातारा पालिका