लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांनी नियमांची पायमल्ली केल्यानेच आज पार्टेवाडी, खर्शी बारामुरे या ६० घरांची वाडी बाधितांचे आश्रयघर बनले असून, बाधित रुग्ण प्रत्येक घरी आढळून येत असल्याने बाधितांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. बाधितांनी होम आयसोलेशनमध्ये न राहता ग्रामस्तरीय विलगीकरण केंद्रात राहण्याच्या सूचना जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केल्या आहेत.
पार्टेवाडी, (खर्शी बारामुरे ता. जावळी ) ६० उंबराचं व साडेतीनशे लोकवस्तीच्या वाडीत ३२ बाधित रुग्ण झाले असून, प्रत्येक घरटी बाधितांचा आकडा वाढत आहे. लक्षणे असूनही अंगावर दुखणे काढण्याचा अट्टहास तसेच नियमांना कोलदांडा देत गावभर फिरण्याने रुग्ण आढळून येत आहेत आणि प्रशासन घालून दिलेल्या नियमांना ग्रामीण लोक डावलत असल्याने ग्रामीण भागात कोरोना फैलाव अधिकच वाढत आहे.
ग्रामीण भागातील बाधित नियमांची पायमल्ली करीत असल्याने शासनाने होम आयसोलेशन बंद केले आहे. येथील बाधितांनी आरोग्य प्रशासनाने ग्रामस्तरीय विलगीकरण केंद्रात राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे बाधितांनी पालन न केल्यास या बाधितांना रायगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवण्याचा विचार आरोग्य विभाग करीत आहे.
चौकट :
आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी बाधितांच्या संपर्कातील ३७ नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये फक्त दोनच बाधित आढळून आले. त्यावेळी पार्टेवाडी गावास गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, वैद्यकीय अधिकारी अनंत वेलकर यांनी भेट दिली. यावेळी सर्कल विजय पाटणकर, ग्रामसेवक मंगेश शिंदे, सरपंच ललिता यादव, आशा स्वयंसेविका माधुरी राजपुरे उपस्थित होते.
(कोट)पार्टेवाडी येथील बाधित रुग्णांनी स्वतःहून स्थानिक ग्रामस्तरीय विलगीकरण कक्षात दाखल व्हावे आणि शासनाच्या कोविड नियमांचे पालन करावे. प्रशासनाला उपचार व्यवस्था करणे सुलभ जाईल, तसेच लक्षणे न लपविता त्वरित पुढे यावे व उपचार घ्यावेत.
-अनंत वेलकर, वैद्यकीय अधिकारी, कुडाळ.