अंगापूर : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान गावागावात सुरू आहे. मात्र, लिंबाचीवाडी (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामदैवत कारजाई देवी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला.
या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या पाच असून, गावातील दोन गटामध्ये तीन - दोन असा सदस्य फाॅर्म्युला ठरला आहे. ग्रामपंचायत बिनविरोधसाठी निवडीमध्ये सदस्य म्हणून रामदास कणसे, मनीषा पिसाळ, संगीता कणसे, बाळकृष्ण कणसे, जयश्री गायकवाड यांची निवड करण्यात आली. पहिले सरपंचपद अडीच वर्षे घेणाऱ्या गटास २ जागा आणि त्यानंतर सरपंचपद घेणाऱ्या गटास तीन जागा असा ठराव कारजाई मंदिर येथे सर्वानुमते घेण्यात आला आहे. या ठरावामध्ये रामदास कणसे यांच्या गटास सरपंचपदाचा पहिला मान देण्याचे ठरले आहे, तर प्रशांत कणसे यांच्या गटास तीन जागा देऊन अडीच वर्षांनंतर सरपंचपदाचा मान मिळणार आहे. यापूर्वी या गावच्या झालेल्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या. येथील दोन पारंपरिक पॅनेलमध्येच या निवडणुका होत होत्या. त्यामुळे या गावच्या निवडणुकीकडे या भागातील जनतेचे नेहमीच लक्ष वेधले जात होते. मात्र, यावेळी ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर धोका टाळण्याबरोबरच निवडणुकीत होणारा भरमसाठ खर्च वाचला आहे व गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून बिनविरोधची संकल्पना राबविण्यात आली. यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह दोन्ही गटांचे प्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ व तरुण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गावाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन होत आहे.
फाोटो.. ०४अंगापूर
सातारा तालुक्यातील लिंबाचीवाडी येथील बिनविरोध निवड झालेले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.