लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून भुईंज परिसरात गुपचूप दारूविक्री करणार्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून दोन गुन्हे दाखल केले.
याबाबत माहिती अशी, भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले हॉटेल राजयोग परमीट रुम बिअर बार येथे हॉटेलचे शटर अर्धे उघडे ठेवून दारूची विक्री सुरु असल्याचे तसेच विरमाडे गावच्या हद्दीत देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला.
यावेळी हॉटेल राजयोग परमीट रूम, बिअर बार येथे शटर अर्धे उघडे ठेवून दारूची विक्री करताना दिसून आले. या हॉटेलवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विरमाडे (ता. वाई) गावच्या हद्दीत किशोर शिवाजी सोनावणे यांच्या राहत्या घराच्या आडोशाला देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण ५ हजार ७६० रुपयांचा माल सापडल्याने त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात साथीचे रोग अधिनियम व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, पोलीस हवालदार विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, रवींद्र वाघमारे, प्रवीण कांबळे यांनी केली आहे.