अगदी साध्या, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्त्री अणि पुरुषानं लग्न न करता एकत्र राहणं म्हणजे ‘लिव्ह-इन रिलेशन’. काही वर्षांपूर्वी केवळ विदेशापुरती मर्यादित असलेली ही संकल्पना आता आपल्याकडेही दृढ होताना दिसत आहे. लिव्ह-इन म्हणजे नक्की काय? कायद्याने त्याचा स्वीकार केला आहे का? याबाबत समाजात अजूनही संभ्रम दिसून येतो. मात्र, अनेक जोडपी लिव्ह-इन मधूनही ‘लिव्ह-इन हॅपीनेस’ असे जीवन जगत आहेत. असे असले तरी यातील चांगल्या-वाईट गोष्टी, धोके आदींकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.
भारतीय समाजव्यवस्थेत विवाह हा सामाजिक करार आहे आणि या कराराला कायद्याचे संरक्षणसुद्धा लाभले आहे. विवाह सामाजिक करार असला तरी हा करार संपुष्टात आणता येतो आणि सहमतीने वेगळे होण्याची सुविधादेखील कायद्याने केली आहे. लिव्ह-इन ही तात्पुरती व्यवस्था असून, ती केव्हा ढासळेल, याची खात्री नसते. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे न्यायालयीन वाद, अनावश्यक रितीभाती, उतारवयातील एकटेपणा टाळण्यासाठी सहजीवनाची आस अशावेळी अनेकजण लिव्ह-इन हा पर्याय निवडतात. ‘लिव्ह इन’ राहण्यामागे कायद्याचा बडगा आणि न पटल्यास फारकत घेताना होणारी कायदेशीर गुंतागुंत टाळणे, हा विचार दिसून येतो.
काही वर्षांपूर्वी लिव्ह-इन ही संकल्पना केवळ विदेशापुरतीच मर्यादित होती. आता ही संकल्पना आपल्याकडे मोठ्या शहरातही रुजली आहे. महाविद्यालय, नोकरी व व्यावसायानिमित्त मोठ्या शहरात राहणारे तरुण-तरुणी ओळखीतून एकत्र येतात. ओळख आणि एकमेकांवरील विश्वास दृढ झाला की मग पुढे लिव्ह-इनचा पर्याय निवडला जातो. असे तरुण ‘सर्व काही हवे’ पण जबाबदारी नको, हे तत्त्व शेवटपर्यंत पाळतात. यातून जर त्यांना संसार थाटावा असे वाटलेच तर पुढे जाऊन विवाह बंधनात अडकतात. बऱ्याचदा ‘लिव्ह-इन’मध्ये असलेल्या जोडप्यांचे खटकेही उडतात. अशावेळी ते सामंजस्य दाखवून व ‘झालं गेलं विसरून’ विभक्तही होतात. वेगळ्या वाटा शोधतात आणि नवं आयुष्य सुरू करतात.
(चौकट)
एकाचा विरोध... दुसरा म्हणतो ‘तो’ त्यांचा प्रश्न :
आपली विवाह व्यवस्था अत्यंत मजबूत असताना, तिला समाजाची, कायद्याची मान्यता असताना समाजाचा एक घटक लिव्ह-इन संस्कृतीला विरोध करत आहे. तर ‘तो’ त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे. सहवासातून प्रेम वाढेल, या प्रेमाची पाळेमुळे खोलवर रुजतील, पुढे ते समाजाला मान्य असलेल्या विवाह बंधनातही अडकतील’ असं सांगत एक घटक लिव्ह-इनचे समर्थनही करत आहे. असे असले तरी काय चांगलं आणि काय वाईट हे ठरविण्याइतकी आजची तरुणाई निश्चितच मॅच्युअर झालेली आहे.
फोटो :