कराड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा जनावरांचा बाजार सध्या बंद झाला आहे. परिणामी बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे. पण, या बाजारात होणारी लाखोंची उलाढालही ठप्प झाली आहे. जनावरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार कसे व कुठे करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
कराडला जनावरांचा बाजार दर गुरुवारी भरतो. सातारा, सांगली जिल्ह्यातून हजारांवर जनावरे येथे विक्रीसाठी दाखल होतात. यात लाखोंची उलाढाल होते. त्याचे बाजार समितीलाही चांगले उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प आहे. गावोगावचे आठवडा बाजार बंद केले आहेत. त्याप्रमाणे कराडचा जनावरांचा बाजारही बंद करण्यात आला आहे. त्याचे परिणाम शेतकरीवर्गावर होत आहेत.
जनावरांच्या बाजारात बैल, गाई, म्हैस, शेळी, मेंढी आदींची खरेदी विक्री होते. येथे असणारे व्यापारी हे व्यवहार करून देतात. त्यातून त्यांना कमिशन मिळते. त्यांचाही उदरनिर्वाह चालतो. पण, बाजारच बंद झाल्याने तेही अडचणीत सापडले आहेत.
आपल्याकडे ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर येतात. आल्यावर येथेच ते बैल खरेदी करतात. चार-पाच महिने गाडीने ऊस वाहतूक व्यवसाय करतात. कारखाने बंद झाले की, बैल विकून गावाकडे जातात. नुकतेच कराड व परिसरातील काही कारखाने बंद झाले आहेत. काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आता या कामगारांना आपले बैल विकायचे आहेत. पण, बाजारच बंद असल्याने ते कोठे विकायचे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. अन्य कोठे व्यवहार करायचा म्हटला तर योग्य किंमत येत नाही, ही त्यांची अडचण झाली आहे.
त्याबरोबरच उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे यादरम्यान चारा टंचाई होणाऱ्या भागातील शेतकरी जनावरे विकण्याचे प्रमाण जास्त होते. उन्हाळा संपला की, पुन्हा जनावरांची खरेदी होते. सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागलेल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. काही शेतकऱ्यांना आपली जनावरे विकायची आहेत. पण, बाजार बंद आहेत. त्यामुळे ती विकायची कोठे, हा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
कोट
कराडला जनावरांचा बाजार मोठा भरतो. तो दोन तीन जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे खरेदी - विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. शेती उत्पन्न बाजार समितीलाही सरासरी एका बाजाराला लाखावर उत्पन्न मिळते. पण, सध्या कोरोना महामारी संकटामुळे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे. गतवर्षीही कोरोनामुळे अनेक महिने बाजार बंद होता. त्याचाही फटका बाजार समितीला बसला आहे.
विजय कदम
उपसभापती
शेती उत्पन्न बाजार समिती कराड
चौकट
कोरोनाच्या महामारी संकटामुळे गतवर्षीपासून शेतकर्यांना फटका बसू लागला आहे. दुधाच्या विक्रीचाही प्रश्न निर्माण होत आहे. खाद्याचे दर आणि दुधाचा दर याचा मेळ बसताना दिसत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. हा व्यवसाय बंद करावा, असे अनेकांना वाटत आहे. पण, गाई, म्हशी विकायच्या म्हटल्या तर त्याला सध्या योग्य किंमत येत नाही. त्यामुळे ''सहन होईना अन सांगताही येईना'' अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
कोट
सध्या गाई आणि म्हशींच्या दुधाला योग्य दर मिळत नाही. खाद्य व दर यांचा मेळ बसत नाही. त्यातच लाॅकडाऊनच्या नावाखाली खाद्याचे दर वाढवलेले दिसतात. या सगळ्या परिस्थितीत व्यवसाय करणे अवघड झाले आहे. परिणामी जनावरे सांभाळणे कठीण बनले आहे.
गोरख पाटील
शेतकरी, वाठार