कुडाळ : जावळी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची चांगलेच उखळ पांढरे होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. केवळ कागदावरच लसीकरण शिबिर आयोजित करून पशुसंवर्धन विभाग कागदी घोडे नाचवत आहे. कुसुंबीमुरा येथे ११ जनावरे दगावूनही पशुसंवर्धन विभागाला जाग येत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जावळी तालुक्यात चार प्रथम वर्ग नऊ द्वितीय वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु हे आज ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. तर खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर शेतकऱ्यांना शेतात सेवा पुरवित असल्यामुळे त्यांचीच तालुक्यात चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. शासन अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवित असतानाही त्या तालुक्यात पोहोचवण्यात पशुसंवर्धन विभाग कमी पडताना दिसतो. जर्सी, होलस्टेन जातींच्या गाईमध्ये आज देशी गार्इंची संख्या कमी होऊ लागली आहे. कुसुंबीमुरा येथे काही जनावरे बोटॅलिझमने दगावली आहेत. यामध्ये देशी गार्इंचा समावेश आहे. दीड-दोन महिन्यांपासून ही जनावरे दगावत असतानाही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याची कसलीच कल्पना नाही. तर मृत्यू झालेल्या एकाही जनावराचा पंचनामा, पोस्टमार्टम पशुसंवर्धनाकडून होत नाही. याचे आश्चर्य शेतकऱ्यांना वाटत आहे. यावर कोणत्याही उपाययोजना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ही निर्माण झाले आहे. यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांची जाणीव करून द्यावी. व पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. (प्रतिनिधी) कुसुंबीमुरातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कुसुंबीमुरा येथील जनावरे बॉटॅलिझमने दगावली आहेत. मात्र, या जनावरांना वेळेत औषधोपचार मिळाले असते तर ही जनावरे दगावली नसती, आज दुभती जनावरेच दगावल्याने येथील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. परंतु त्यांना किमान नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
पशुसंवर्धनच्या अकार्यक्षमतेमुळे जावळीत पशुधन धोक्यात
By admin | Published: February 22, 2015 10:07 PM