सातारा : कोरोना विषाणूमुळे संचारबंदी लागू करण्यात आली असलीतरी पशुवैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाकाळातही पशुधनाच्या वैद्यकीय उपचाराबरोबरच लसीकरणाची मोहीम सुरू आहे. सध्या घटसर्प व फऱ्या रोगाची लस आली असून, लवकरच लसीकरण सुरू होणार आहे.
जिल्ह्यात ११ लाख ९६ हजार ४५८ पशुधन आहे. यामध्ये गाय आणि बैलांची संख्या अधिक आहे. तसेच शेळ्या आणि मेंढ्यांसारखे पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकत आदी लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात नियमितपणे राबविण्यात येते. केंद्र शासनाच्या माध्यमातून दरवर्षी लाळ खुरकत रोग लसीकरण जनावरांना करण्यात येते. वर्षातून दोनवेळा हा लसीकरणाचा कार्यकम असतो. जून ते जुलै आणि डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जनावरांना लसीकरण करण्यात येते. यासाठी नोंदणी शुल्क म्हणून एक रुपया शुल्क आकारले जाते. घटसर्प, फऱ्या लस पावसाळ्यापूर्वी गाय, म्हैस, बैलांना दिली जाते. याचे १०० टक्के लसीकरण होत नाही. मागील ५ वर्षांत रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा ठिकाणच्या तसेच नदीकाठच्या गावांतील जनावरांना ही लस देण्यात येते.
..............................
चौकट :
जिल्ह्यातील जनावरांची एकूण आकडेवारी
शेळ्या ३,४५, ३३८
मेंढ्या १,७९,७२१
गाय-बैल ३,४७,८४६
म्हैस ३,२३,५५३
..........................................
जनावरांना या लसी दिल्या जातात...
- वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पशुधनासाठी लसीकरण केले जाते. पशुवैद्यकीय विभागाकडून घरोघरी जाऊन पशुधनाची संख्या पाहून लसीकरण मोहीम राबविली जाते.
-एफएमडी, घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकत आदी लसीकरण पाठीमागे करण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी राबविण्यात येणारी लसीकरण मोहीम लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी लसही उपलब्ध झालेली आहे. जून महिन्यात हे लसीकरण सुरू होणार आहे.
..............................................
कोरोनाकाळातही बजावली सेवा
कोरोना विषाणूच्या संकटकाळातही पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनावरांच्या लसीकरणात खंड पडू दिला नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर लगेच मोहीम हाती घेण्यात आली. आताही पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.
................................
पशुधनासाठी नियमित लसीकरण मोहीम
जिल्ह्यात पशुधनाचे लसीकरण नियमित सुरू आहे. त्यामध्ये खंड पडलेला नाही. आताही पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी लसही उपलब्ध झाली आहे. नियोजन करून लवकरच जनावरांना लसीकरण करण्यास सुरुवात केली जाईल.
- डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
.............................................
पशुवैद्यकीय सेवेबद्दल समाधान
आमच्या गावात नियमितपणे पशुवैद्यकीय सेवा मिळते. जनावरांना घटसर्प, लाळ खुरकत तसेच इतर लसीकरण करण्यात येते. आताही पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण सुरू होईल. पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सतत मार्गदर्शन केले जाते.
- प्रल्हाद आटपाडकर
......................
कोरोनामुळे जनावरांना लसीकरण वेळेत होणार का, अशी चिंता होती. पण, पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत तरी लसीकरणात खंड पडू दिलेला नाही. पावसाळ्यापूर्वीचे लसीकरणही लवकर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- श्यामराव काळे
.................................................................