लोणंद : वीज मंडळाचे सहायक अभियंता व कर्मचारी यांनी ग्राहकांचे ऐकून न घेता व पूर्वसूचना न देता कृषिपंप, व्यावसायिक व घरगुती कनेक्शन तोडल्याने सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी ‘आरपीआय’च्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती उपकार्यकारी अभियंता सचिन काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने नियमावली घालून दिलेली असताना पन्नास ते सत्तर टक्के वीज बिल भरून घ्यावे. संपूर्ण बिलाची रक्कम भरण्याबाबत तगादा लावू नये, कृषिपंप व्यावसायिक तसेच घरगुती वीज कनेक्शन ग्राहकांना उर्वरित ३० टक्के रक्कम भरण्यास वेळ द्यावा; अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल. तसेच वेळप्रसंगी कार्यकर्ते महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकतील व होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कंपनीवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पवन धायगुडे, अरुण कोळेकर, बाळासाहेब धायगुडे, अरुण गायकवाड, सविता सपकाळ, समीर घोडके, नंदकुमार दरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.