फलटण : फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात मंगळवारपासून कडक लॉकडाऊन प्रशासनाने जाहीर केला आहे. या काळात सर्व व्यवहार व वाहतूक बंद राहावी, अशी प्रशासनाची अपेक्षा असली, तरी नागरिक मात्र पळवाटा शोधत आहेत. मंगळवारपासून सामान्य लोकांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री बंद असेल, असे जाहीर केल्यानंतर सकाळपासून पेट्रोलपंपावर वाहनचालकांची गर्दी होती. नेहमी शंभर, दोनशे रुपयांचे पेट्रोल भरणारी मंडळी खमक्या आवाजात म्हणत होती, मंगळवारपासून कडक लॉकडाऊन आहे... टाकी फुल्ल कर !
प्रशासन कोरोना रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असताना, नागरिक मात्र घराबाहेर पडण्याचा सर्व क्लृप्त्या वापरत आहेत. कडक निर्बंध लागू केल्यानंतरही नागरिकांनी गर्दी करून कोरोनाच्या प्रसाराला हातभार लावला, आता प्रशासन आणखी कडक लॉकडाऊनची तयारी करत असताना, नागरिक मात्र वाहनांच्या टाक्या फुल्ल करून पुन्हा बाहेर पडण्याची तयारी करत आहेत.
जिंती नाका तसेच फरांदवाडी येथील पेट्रोल पंपावर रोजच्यापेक्षा अधिक गर्दी होती. येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, सकाळपासून टाकी फुल्ल करणारे खूप ग्राहक होते. यात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात होते.