सातारा : राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीचा सातारा जिल्ह्यात फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येत आहे. कारण १५ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल २४ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यासह सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू करतानाच निर्बंधही अधिक कठोर केले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे चार तासात साताराच नव्हे तर जिल्ह्याची बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येत आहेत अन् हीच गोष्ट कोरोनाचे संक्रमण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
संचारबंदीच्या कालावधीत कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे वाटत होते; परंतु सातारा जिल्ह्याच्या बाबतीत या उलट घडू लागले आहे. संचारबंदीच्या अगोदर रुग्ण संख्या कमी होती. तर संचारबंदी लागू झाल्यानंतर बाधितांचे संख्येने नवे उच्चांक प्रस्थापित केले. कधी नव्हे ते कोरोना बाधितांनी २४ तासांत दोन हजारांचा टप्पाही ओलांडला. संचारबंदी लागू झाल्यापासून केवळ पंधरा दिवसांत जिल्ह्यात २४ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा आकडा धडकी भरवणारा असाच आहे.
(चौकट)
शाळा, महाविद्यालय ताब्यात घ्या..
बेडची संख्या कमी रुग्ण संख्या जास्त अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली आहे. त्यामुळे १३ हजारांहून अधिक रुग्ण सध्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. प्रशासनाकडून गृहविलगीकरणातील रुग्णांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. अनेक रुग्ण शहरात खरेदी तसेच औषधोपचारासाठी स्वत: ये-जा करतात. अशा रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात एकही पथक नाही. केवळ प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे. अशा रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. सद्यस्थितीत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय बंद आहेत. या ठिकाणी गृहविलगीकरणाची व्यवस्था केल्यास कोरोना बाधितांवर उपचार करणे सोपे होऊ शकते.
(पॉइंटर)
हे करण्याची गरज
- संचारबंदी असली तरी लपून-छपून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
- या नागरिकांची जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे.
- बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवावे.
- कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचे ट्रेसिंग करावे
- प्रतिबंधात क्षेत्रात पाळीपाळीने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी
- संचारबंदी, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी.
(पॉइंटर)
जिल्ह्यात असा वाढतोय कोरोना
दिनांक कोरोनाबाधित मृत्यू
१५ ११८४ २२
१६ १३९५ १५
१७ १५४३ ३८
१८ १४३४ ३३
१९ १२१२ ४१
२० १५७१ ३६
२१ १६९५ ३७
२२ १८१६ २८
२३ १७४५ ३४
२४ २००१ ३४
२५ १९३३ ३९
२६ १४३४ २६
२७ १६६६ ३३
२८ १८१० ३४
२९ २२५६ ४२
एकूण २४६९५ ४९२