महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेस समांतर असलेल्या मरी पेठेतील हॉटेल लक्ष्मी लॉजमधील एका खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत खोलीतील टीव्ही, पंखा, वातानुकूलित यंत्रणा आदी साहित्य जळून खाक झाले. नगरपालिकेचा अग्निशमक बंब वेळीच पोचल्याने अनर्थ टळले.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मुख्य बाजारपेठेस समांतर मरी पेठ परिसरातील लक्ष्मी हॉटेलमधील एका बंद खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. खोलीमध्ये कुणीही नव्हते. या खोलीला प्लास्टिकचे सिलिंग, लाकडी फर्निचर असल्याने ही आग खोलीभर पसरली. खोलीमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्याने याबाबतची माहिती लॉज व्यवस्थापकाने पालिकेस दिली. अग्निशमक बंब घेऊन पालिकेचे कर्मचारी शिवाजी खंडझोडे, बाळू ननावरे, बंडू सपकाळ आदींनी तातडीने घटनास्थळी दाखल होते. स्थानिकांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविले या आगीत खोलीतील टीव्ही, एसी, पंखा, फर्निचर प्लास्टिक सिलिंग असे सुमारे एक लाख रुपयांपेक्षा अधिकचे साहित्य जळून खाक झाले.