सातारा : लोकसभेच्या सातारा मतदार संघासाठी मंगळवारी सरासरी ६० टक्के मतदान झाले. २०१४ च्या निवडणुकीपेक्षा ४ टक्क्यांनी मतांची वाढ झाली आहे. या मतदानानंतर खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यासह एकूण ९ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले. अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सातारा मतदार संघामध्ये मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्या, त्यामुळे मतदानासाठी सायंकाळी अर्धा ते एक तासापर्यंत वेळ वाढवून देण्यात आला. या मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास कडक ऊन असतानाही नागरिकांनी मतदान केले. ऊन कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतदारांची संख्या वाढत गेली.सातारा मतदार संघात १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार आहेत. त्यापैकी सरासरी ५८ टक्के मतदारांनी हक्क बजावला. मागील निवडणुकीत ५६.७८ टक्के मतदान झाले होते. त्यात यंदाच्या निवडणुकीत थोडीफार वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील (शिवसेना), सहदेव ऐवळे (वंचित बहुजन आघाडी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर (अपक्ष), आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), सागर भिसे (अपक्ष), अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले.जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या. सातारा तालुक्यातील नागेवाडी, नागठाणे. कोरेगाव तालुक्यातील आसनगाव. कºहाड तालुक्यातील कालगाव, उंब्रज. जावळी तालुक्यातील जवळवाडी. खंडाळा तालुक्यातील लोणंद. खटाव तालुक्यातील जायगाव.फलटण तालुक्यातील सासवड, तसेच वाई तालुक्यातील काही गावांत मतदान प्रक्रिया सुरू होती. तेव्हा मशीनमध्ये बिघाड झाल्याने तासन्तास मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. अनेक मतदार तेव्हा रांगेत उभे होते. काहीजण परत येतो, असे म्हणून माघारीही निघून गेले. ज्या ठिकाणी मशीनमध्ये बिघाड झाला, त्या ठिकाणी निवडणूक विभागाने मतदानासाठी वेळ वाढवून दिली होती. मतदान मशीनच्या बिघाडामुळे निवडणूक यंत्रणेवर मोठा ताण आलेला पाहायला मिळाला.
Lok Sabha Election 2019 सातारा मतदार संघात ६० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:11 PM