सातारा : लोकसभा निवडणुकीमुळे प्रचार सभा आणि दौऱ्यांमुळे राजकीय खडाजंगी जोरदारपणे सुरू आहे. या प्रचारातील एक ना एक क्षण उमेदवारांसाठी महत्त्वाचा असतो, असे असतानाही खासदार उदयनराजे भोसले यांनी वेळात वेळ काढून विरोधी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या आई उपचार घेत असणाऱ्या रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांची ही कृती राजकारणापेक्षा माणुसकी महत्त्वाची असते, हे दाखवणारी ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणूक प्रचारासाठी खासदार उदयनराजे बुधवारी संध्याकाळी कऱ्हाड-पाटण दौऱ्यावर गेले होते. सणबूर-ढेबेवाडी परिसरात दौरा सुरू असताना सध्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील यांना आई वत्सलाबाई या मंद्रुळकोळे येथील घरात घसरून पडल्याचे समजले. यावेळी त्यांच्यासोबतच उदयनराजे भोसले होते. फारशी दुखापत नसेल, असं समजून उदयनराजे यांनी रमेश पाटील यांना दौºयातून घरी जाण्यास सांगितले.
तासाभरानंतर पुन्हा संवाद साधल्यानंतर पाटील यांच्या मातोश्री वत्सलाबाई पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. हाडांना दुखापत झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातच ठेवावे लागणार असल्याचे समजताच उदयनराजे यांनी त्यांचा दौरा आटोपता घ्यायचं ठरवलं. दौरा अर्ध्यावरच सोडून त्यांनी थेट कऱ्हाड गाठले. तिथं उपचार घेत असलेल्या रुग्णालयात त्यांनी वत्सलाबाई पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुढील उपचारांची माहिती घेतली. त्यानंतर गंभीर दुखापत लक्षात घेता एअरबसने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निश्चित करून उदयनराजे पुन्हा साताऱ्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे सेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या त्या मातोश्री आहेत.