सागर गुजर । सातारा : निवडणुकांच्या प्रचारसभा गाजविणारे अनेक धुरंधर नेतेमंडळी ऐन लोकसभा निवडणुकीत ‘न्यूट्रल’ झाले असल्याने त्यांचा अभाव जाणवताना पाहायला मिळत आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, शालिनीताई पाटील, बकाजीराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्या गैरहजेरीची चर्चा मतदार संघात जोरदार सुरू आहे.माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, त्यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार शालिनीताई पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील आदी नेत्यांच्या प्रभावशाली भाषणांसाठी लोक गर्दी करत असत. एक काळ असा होता की या नेत्यांपैकी अनेकांना मुलूख मैदान तोफ ही बिरुदावली लावण्यात आली होती. आता हीच मंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात म्हणाव्या तितक्या प्रमाणात सक्रिय दिसत नाहीत.
काहीजण केवळ हजेरी दिसण्यासाठी ठराविक सभांना येतात. मात्र, सातत्याने प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होताना कोणी दिसत नाहीत. कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँगे्रसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी कुणालाच दुखवायचे नाही, अशी भूमिका घेतलेली दिसते. माजी खासदार श्रीनिवास पाटील हे तर खासदार शरद पवार जेव्हा सातारा जिल्ह्यात सभा घेतात, त्याच व्यासपीठावर उपस्थित राहतात. इतर सभांना त्यांनी आपली हजेरी लावलेली दिसत नाही.
शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांची नरेंद्र पाटील यांच्या प्रचारातील उपस्थिती तुरळक आहे. नितीन भरगुडे-पाटील हे लोणंद येथे उदयनराजेंच्या प्रचारासाठी झालेल्या सभेला गेले होते. त्यानंतर लोकांमध्ये मिसळून जो प्रचार करायला हवा, तो करताना ते दिसले नाहीत. खंडाळ्यातील ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांना शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते भेटून गेले. मात्र, पाटील हेही प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. पाटणचे नेते विक्रमसिंह पाटणकर हे उदयनराजेंच्या प्रचाराची मोठी सभा असेल तरच व्यासपीठावर पाहायला मिळतात.
कोरेगावच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कोरेगावात मेळावा घेतला होता. मागील विधानसभा निवडणुकीत प्रलोभनाला भुललेल्या मतदारांमुळे आपला पराभव झाला, असा त्यांनी आरोप केला होता. आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरोधात काम करत असताना खासदार उदयनराजे भोसले आपल्याला मदत करतील, असे शालिनातार्इंना वाटले होते. मात्र लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्या हातात-हात घालून प्रचार सुरू केल्याने शालिनीतार्इंचा भ्रमनिरास झाल्याची चर्चा कोरेगाव तालुक्यात सुरू आहे.अलिप्त राहण्यामागे विधानसभेचे गणितखासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार झाडून कामाला लागले आहेत. आपापल्या सुभ्यात प्रचारफेºया काढून उदयनराजेंना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने या आमदार मंडळींच्या विधानसभा प्रचाराची पहिली फेरी पार पडली आहे. आमदारांविरोधात त्या-त्या मतदार संघात विरोधाची लाट आहे. विधानभेची निवडणूक लढण्याची सुप्त इच्छा मनात असणारी मंडळी या निवडणुकीत अलिप्त आहेत. आपण जर या निवडणुकीत फिरलो तर या आमदार मंडळींनाच फायदा होऊन आपल्या अडचणी वाढतील, या भावनेपोटी व विधानसभेचे गणित डोक्यात ठेवून अनेकजण या निवडणुकीत अलिप्त राहिलेले पाहायला मिळत आहेत.