सातारा - भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा आमदार प्रशांत परिचारक जवानांच्या कुटुंबीयांबद्दल अपशब्द वापरतो, तरी भाजप कारवाई करत नाही, तो आमदार राहतो आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो ही जवानांबद्दलची भाजपाला आस्था आहे अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातारा येथील जाहीर सभेत केली.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबद्दलच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला. त्याचसोबत अकलूजमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणावेळी हाच परिचारक मोदींच्या व्यासपीठावर होता याचा फोटो राज ठाकरेंनी व्यासपीठावर दाखवला.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपले सैनिक काश्मीरमध्ये चेकपोस्टवरती प्रामाणिकपणे त्यांचं कर्तव्य बजावत असताना, कोणीतरी ३,३ चेकपोस्ट तोडून घुसणाऱ्याला नाईलाजाने गोळी मारली. पुढे काश्मीर पेटलं आणि अशा वेळेला सैन्याच्या नावावर राजकरण करणाऱ्या मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्यात असं राज यांनी सांगितले.
मोदी सत्तेत आल्यावर जेवढे सैनिक शहीद झालेत तेवढे ह्याच्या आधी कधी झाले नव्हते. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ असं सत्तेत येणाच्या आधी म्हणणारे मोदी, स्वतःच्या शपथविधीला नवाब शरीफना बोलवतात, त्यांना केक भरवतात. त्यावर शहीद जवानांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल? असा सवाल राज यांनी केला.
आज सैन्यातील जवान अत्यंत कठीण परिस्थितीत देशांच्या सीमांचं रक्षण करत असतात, आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवनांचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेतात. १५ एप्रिलला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही? तुमच्या हातात सगळी सत्ता आहे मग तरीही सीमांच्या आडून शस्त्र, अतिरेकी येतात कुठून आणि कसं? शहीद जवानांच्या नावावर मतं मागताना पंतप्रधानांना लाज वाटत नाही का? असा घणाघात राज ठाकरे यांनी साताऱ्याच्या जाहीर सभेत केला.