नितीन काळेल ।
सातारा : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यात येत आहे. कोणी पक्ष सोडला तर कोण सोडण्याच्या वाटेवर आहे. तर कोणी वेगळी चूल मांडत आहे या प्रकारामुळे युती आणि आघाडीसाठी ही नवीच डोकेदुखी ठरली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्यातून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे घेण्यासाठी पावले उचलली; पण ‘हाती’ काय लागले नाही. त्यातच राष्ट्रवादीला विरोध करणाºया महाआघाडीतील सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यामुळे महाआघाडीतील काहीजण नाराज झाले. परिणामी रणजितसिंहांनी ‘हात’ सोडून कमळ जवळ करत उमेदवारीही मिळवली; पण काँग्रेस घायाळ झालीच. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. त्यावेळी जिल्ह्यात एक नंबरवर पक्ष घेऊन जाण्याच्या वल्गना सर्वांनीच मतभेद विसरून केल्या; पण रणजितसिंहांच्या भाजपमधील जाण्याने काँग्रेस बॅकफूटवरच गेली.
राष्ट्रवादीत असणारे शेखर गोरे यांचा पक्षावर राग आहे. पाच दिवसांपूर्वी मेळावा घेऊन त्यांनी ताकद दाखवून दिलीय. तर साताºयात रविवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले व पक्षही सोडला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा धक्काच आहे. तसेच पक्षातून बाहेर पडण्याने माण तालुक्यात पक्ष आणखी कमकुवत झाला आहे. राष्ट्रवादीला हे भगदाड मुजवता मुजवता नाकीनऊ येणार आहे. तर शेखर गोरे यांनी या निवडणुकीत माढ्यातील भाजप उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.
जावळीतील भाजप नेते अमित कदम पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच; पण राजकीय घडामोडीत ते भाजपवासी झाले. ते सातारा लोकसभा मतदार संघात वेगळी चूल मांडत आहेत. शिवसेनेचा उमेदवार व युतीची नेतेमंडळी विचारात घेत नाहीत. पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते, हे त्यांचे व कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण. त्यामुळे मेळावा घेऊन निवडणुकीत वेगळा विचार करू, अशा निर्णयापर्यंत कार्यकर्ते आले आहेत. युतीच्या उमेदवारासाठी ही धोक्याची घंटा ठरलीय. तसे पाहायला गेले तर उदयनराजे भोसले यांच्याबरोबर कदम यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यामुळे ते अंतिम निर्णय काय घेतात यावर बरेच अवलंबून आहे.
भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम हे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे पुत्र आहेत. आजही त्यांचा तालुक्यात गट आहे. माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देताना पक्षाने विचारले नसल्याची सल त्यांना होती.
त्यामुळे मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांना भेटून सल्लामसलत केली. मात्र, दुसºयाच दिवशी त्यांनी माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
केला. त्यांचा गट किती मोठा यापेक्षा चुरस असताना एक-एक मतही महत्त्वाचे आहे. इथे कदम यांनी माघार नाही घेतली तर त्याचा परिणाम कदाचित कोणासाठी चांगला तर कोणासाठी वाईटही ठरू शकतो.
डोकेदुखीवर जालीम औषधाची गरज...
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय गणिते सतत बदलत आहेत. कधी उमेदवारीवरून तर कधी विचारात घेतले नसल्याचा कारणावरून. संबंधित राजकीय नेते आणि पदाधिकाºयांची ही खदखद निवडणुकीत आपल्याच उमेदवाराला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे यावर पक्षातीलच वरिष्ठांना औषध शोधावे लागणार आहे.