सातारा : माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचाही तिढा आता सुटला असून, अर्ज भरण्यापूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजपच्याही उमेदवाराने मतदार आणि नेत्यांच्या भेटी घेण्यावरभर दिला आहे. संजय शिंदे यांच्याबरोबरच रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.माढा लोकसभा मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे. या दोन्ही पक्षांना आपलाच उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यासाठी लागेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवण्यात आलीय.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता. शेवटी भाजपच्या साह्याने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजय शिंदे यांना पक्षात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादीने माढ्यातून उमेदवारी जाहीर केली.
शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून आठ दिवस होत आलेतरी भाजपचा उमेदवार कोण, हे ठरत नव्हते. त्यामुळे उमेदवार कोण? याचाच गुंता वाढला होता. शुक्रवारी दुपारी हा गुंता सुटला असून, फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नावावार पक्षाने मोहर उमटवली आहे. त्यामुळे माढ्यातील लढत आता स्पष्ट झाली आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी अर्ज भरण्यापूर्वीच मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच गावांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला जातोय.भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उमेदवारी मिळणार म्हणूनच मतदार संघात गाठीभेटी सुरू केल्या होत्या. त्यांची शुक्रवारी उमेदवारी जाहीर झाली; पण ज्या दिवशी भाजपात प्रवेश घेतला, तेव्हापासून मतदार संघातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटून ते संवाद साधत आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचा प्रचारावर भर राहणार आहे.