दीपक शिंदे
सातारा : सातारा लोकसभा निवडणूक ही खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे हॉट सीट झाली आहे. शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि भाजपकडून उदयनराजे लढत आहेत. ही निवडणूक सातारा लोकसभा मतदारसंघातील असली तरी या निवडणुकीत साताऱ्याच्या विकासाचे प्रश्न सोडून मुंबईतील बाजार समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतो आहे.
उदयनराजे भोसले यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना मुंबई बाजार समितीमधील भ्रष्टाचारावरून टार्गेट केले जात आहे. तर, शशिकांत शिंदे यांनी आता लोकांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळे मला कोणावर टीका करायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रचारात रोज वेगळे आरोप आणि प्रत्यारोप होत असताना सातारा जिल्ह्यातील समस्या आणि विकासाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहिला आहे.
साताऱ्यातील जनतेला अनेक बाबतीत रखडलेला साताऱ्याचा विकास हवा आहे. असे असताना वेगळ्याच मुद्दांची चर्चा होत असल्यामुळे लोकांनाही निवडणुकीतील मुद्दे फारसे रुचताना दिसत नाहीत.
उदयनराजेंची रणनीती
आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच आरोप करून त्यांना त्यातच अडकवून ठेवण्याची रणनीती उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यामुळे मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचार आणि औद्योगिक विकासाला अडथळा आणण्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
शशिकांत शिंदेंचे आव्हान
शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव आणि जावली या तालुक्यांतून आमदार म्हणून काम केले आहे. याशिवाय कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर हे दोन तालुके महाआघाडीच्या आमदारांकडे आहेत. पाटणमधून विक्रमसिंह पाटणकर आणि वाई, महाबळेश्वर, खंडाळामधून कामगार संघटना यांच्या माध्यमातून त्यांनी उदयनराजेंपुढे आव्हान उभे केले आहे.
तर गटातटाचा फटका
आमदार मकरंद पाटील गट, शंभूराज देसाई यांचाही गट नाराज होता. त्यांच्यात दिलजमाई झाली आहे. पण, ते किती मनापासून काम करतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शशिकांत शिंदे यांनी अनेक गटा-तटांची जुळवाजुळव केली आहे. त्यांच्याकडेही उंडाळकर गट नाराज होता. त्यांनीही काम करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे किती गट जुळतात आणि कसे काम करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
सातारा जिल्ह्यात एमआयडीसीचा विकास होणे अपेक्षित होते. त्या प्रमाणत तो झालेला नाही. त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी सातारा येथून थेट पुणे, मुंबईला जावे लागते.
सातारा एमआयडीसीमध्ये काही मोठ्या कंपन्या होत्या. पण, त्या बंद पडल्या आहेत. तिथे नवीन कारखाने सुरू झालेले नाहीत.
दुष्काळी भागाकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही. पर्यटनाच्या संधी खूप आहेत, पण काम फक्त कागदावरच आहे.
२०१९ मध्ये काय घडले ?
श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी (विजयी) ६,३६,६२०
उदयनराजे भोसले (भाजप) ५,४८,९०३
चंद्रकांत खंडाईत (वंचित) १७२०३
नोटा - १०,१५९
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के
२०१४ उदयनराजे भोसले राष्ट्रवादी ५,२२,५३१ ५३%
२००९ उदयनराजे भोसले राष्ट्रवादी ५,३२,५८३ ६५%
२००४ लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी २,८१,५७७ ४१%
१९९९ लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी ३,१३,३२५ ४६%
१९९८ अभयसिंहराजे भोसले राष्ट्रवादी ३,८९,२३८ ६५%