सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासूनच उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात एकूण १८ लाख ८९ हजार ७४० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली असून २३१५ मतदान केंद्रांवर अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.
सातारा जिल्ह्यात तापमान ४२ अंशापर्यंत जात असल्याने सकाळीच मतदारानी मतदानासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अनेक मतदार केंद्रांवर सध्या रांगा लावून मतदान सुरू आहे. बारा वाजेपर्यंतच अधिकाधिक मतदान होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूल या ठिकाणी सातारा लोकसभेतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सकाळी सात वाजून सात मिनिटांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
प्रशासनाच्या वतीने देखील सातारा लोकसभा मतदारसंघात १३ वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. लोकांमध्ये मतदानाचा उत्साह वाढवा आणि जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी हे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी देखील आपल्या पत्नी अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्यासह सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.