सातारा : ‘लोकमत’ ने सुरू केलेल्या वृत्त मालिकेमुळे राज्य व जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील पडलेले खड्डे मुजविणे सोपे झाले. या रस्त्यांच्या कामांचे दैनंदिन अहवाल मला मिळत होते. मात्र ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमधून उर्वरित रस्ते निदर्शनास आले आणि कामाला वेग देता आला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.
जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले. विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. रस्ते करण्याची प्रचलित पद्धत कायम आहे. अनेकदा पाऊस पडला की रस्ता खराब होतो, हे नेहमीचे गणित आहे. यंदा तर पावसाने हद्दच केल्याने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती होती. रस्त्यांची चाळण झाल्याने सर्वच माध्यमांतून सरकारवर टीका होऊ लागली.
नोव्हेंबर महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मंत्रालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम विभागातील वॉररूमही तयार करण्यात आली. दीड महिन्यात तब्बल २ हजार ४२८ किलोमीटर अंतरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवायचे काम सुरू करण्यात आले.एक हजार ७०० कामगार कार्यरतठेकेदारांचे ८५ युनिट जिल्हाभर कार्यरत आहेत. एका कामावर २० कामगार असे एकूण १ हजार ७०० कामगार राबत आहेत. हे काम वेगाने करायचे असले तरी संबंधित ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराला वेगळे पैसे मिळणार नाहीत. दिलेल्या रकमेतच दुरुस्तीचे काम करावे लागणार आहे. त्यांना तशी अटही घातली गेली असल्याने सुदैवाने रस्त्यांवर लगेच खड्डे पडतील, ही शक्यता सध्या तरी दिसत नाही.
बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी केवळ खड्डेच मुजविले नाहीत तर रस्त्याच्या साईडपट्ट्याही भरल्या आहेत. २५ डिसेंबरपर्यंत उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण होतील.- संभाजी माने, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम