विलासराव पाटील हे खऱ्या अर्थाने काँग्रेस विचारांशी इमान राखणारे, जीवनाच्या अखेरपर्यंत या विचारांवरील आपली निष्ठा अढळ ठेवणारे लोकांमधील नेते होते. कराड दक्षिणसाठी व सातारा जिल्ह्यातील विलासकाका ही केवळ कथा नव्हे तर दंतकथा बनून राहील. विलासकाकांचे राजकारण, समाजकारण, ग्रामीण जनजीवनाशी असलेली नाळ, सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेली सत्तेची संधी, पन्नास वर्षे राजकारण, सहकारात केलेली लक्षवेधी कामगिरी असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहेत. आज ते आपल्यातून निघून गेलेत, पण कराड दक्षिणमध्ये अजून काही पिढ्या त्यांच्या कामाचे गोडवे सांगतील...
काका नावाचे अजब रसायन आहे. म्हटले तर तो कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने विठ्ठल होता. वारकऱ्यांशिवाय विठ्ठल नाही आणि लोकांशिवाय काका नाहीत, हे दक्षिणेतील जनतेने अनुभवले आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सातवेळा काका कराड दक्षिणमधून विजयी झाले. दक्षिण कराड हा आजवर काँग्रेसचा हुकमी गड म्हणून राज्याला परिचित आहे. या गडाची भक्कम बांधणी विलासराव पाटील यांनी आपल्या अफलातून लोकसंपर्काने केली. सामाजिक, राजकीय क्षेत्रात १९६७ पासून अविरतपणे कार्यरत असलेले नेतृत्व म्हणजे लोकनेते विलासकाका. सन १९८० साली काकांनी कराड दक्षिण मतदारसंघातून पहिली विधानसभा लढवली. त्याचवेळी सातारा जिल्हा बँकेत विलासराव पाटील संचालक म्हणून निवडून गेले. तेव्हापासून ते आजपर्यंत संचालक होते. एका आयुष्यात किती व कोणकोणत्या क्षेत्रांत काम करायचे, याला मर्यादा आहेत. मात्र, विलासरावांनी सहकार, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक असा विविध क्षेत्रांत आपला संचार ठेवला. एका आयुष्यात होणार नाही, इतके काम त्यांनी करून ठेवले. अर्थात, यामागचे बाळकडू दिवंगत यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्याकडून त्यांना मिळाले. हा वारसा त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत जोपासला. काँग्रेस पक्षाची विचारधारा त्यांच्या नसानसांत भिनलेली होती. मध्यंतरी ते पक्षापासून दूर होते. मात्र, विचार कॉंग्रेसचेच होते. राजकीय स्थित्यंतरात त्यांना अन्य पक्षांचे निमंत्रण होते. सत्तेची संधी असताना त्यांनी हा विचार मनात आणला नाही. कॉंग्रेस पक्षाची अवस्था बिकट होत असताना कॉंग्रेसला आता प्रबोधन शिबिरांची गरज आहे, हे विलासरावांनी आपल्या आयुष्यातील अखेरच्या सभेतही ठासून सांगितले. प्रबोधनाची गरज ते फक्त सांगून थांबले नाहीत, ही प्रबोधन शिबिरे उंडाळेत, कराडात सतत होत होती. कार्यकर्त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे, ही त्यांची आग्रही भूमिका होती.
विलासराव पाटील यांनी १९८० पासून दक्षिणेतील डेंगरी व दुर्गम भागात दक्षिण मांड नदी खोरे पॅटर्न राबवले. अनेक तलाव, धरणे बांधली. भारतातील पहिला वारणा आणि कृष्णेचा नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात साकारला. दक्षिणेत सुमारे ३५वर्षांत शासकीय यंत्रणा, लोकसहभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या सहभागातून त्यांनी अडीच टीएमसी पाणी अडवण्याची किमया करून दाखवली. कृषी प्रदर्शनात एका पाहुण्याने, एवढे पाणी अडविण्यासाठी किमान १ हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून द्यावे लागतील, हे काम विलासराव पाटील यांनी लोकसहभाग आणि शासनाच्या माध्यमातून करून दाखवले असल्याचे सांगितले.
विकास म्हणजे केवळ रस्ते, समाजमंदिरे, शाळा हा नाही. त्यांनी ३५ वर्षांत दक्षिणच्या डेंगरी भागातून मुंबईला रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवले. ज्या भागात मुसळ उगवत नव्हते, त्या भागात सिंचनाचा प्रश्न मार्गी लावत शेतक-याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध केले. डेंगरी भागात साखर कारखान्याची अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली. दक्षिणच्या भूमीत विविध शिबिरे, कार्यक्रम आयोजित करत माणसांमध्ये पुरोगामी विचारांची पेरणी केली. विलासराव पाटील यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या नेतृत्वामुळेच डोंगरी भाग विकासाच्या प्रवाहात आला. डोंगरी भागात एकेका छोट्या गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आली, अशी दृष्टी असणारे नेतृत्व पुन्हा लाभणार नाही.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रातील तरुण कार्यकर्त्यांना सहकारात काम करण्यासाठी प्रवृत्त केले. या तरुण कार्यकर्त्यांत विलासराव पाटील यांचे नाव अग्रणी होते. सातारा जिल्हा बँकेत ते सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक होते. त्यांच्या करड्या शिस्तीने ही बँक प्रगतीपथावर आली. नाबार्डने अनेक पारितोषिके देऊन या बँकेला गौरवले आहे. त्यांनी सहकारमंत्री म्हणूनही काम पाहिले. दक्षिणेत खरेदी-विकी संघ, कोयना दूध संघ, कोयना बँक, रयत साखर कारखाना, श्यामराव पाटील पतसंस्था, शेती उत्पन्न बाजार समिती अशा विविध संस्थांना त्यांनी नेतृत्व दिले. आपल्या सहकारातील अभ्यासाच्या जोरावर त्यांनी या संस्थांची प्रगती साधली. त्यांच्या निधनामुळे त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ता पोरका झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटली, ती तंतोतंत होती. कार्यकर्त्यांवर पुत्रवत प्रेम करणारा नेता म्हणून त्यांची खरी ओळख होती.
नेता आणि कार्यकर्त्यांत एक ओढ असावी लागते, ती विलासराव पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत दिसायची. ते माणसांमध्ये नसले तर अस्वस्थ असायचे. गेली ५० वर्षे लोकांमध्ये मिसळून काम करणारे विलासराव पाटील कोरोना महामारीत जखडल्यासारखे होते. फोनवरून कार्यकर्त्यांना संपर्क करायचे. काँग्रेसपासून दुरावलेल्या अवस्थेत पाच वर्षे काढल्यानंतर ते आठ महिन्यांनी कराडला आले. काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर भरभरून बोलले. त्यांचे ते २८ मिनिटांचे भाषण कार्यकर्त्यांनी कानांत प्राण आणून ऐकले. काकांचे दर्शन झाले, भाषणही ऐकले. त्या भाषणातून मिळालेली ऊर्जा कार्यकर्त्यांसाठी शेवटची ठरली. मात्र, नेते अनेक होतील, पण काकांसारखा सर्वसामान्यांचा लोकनेता पुन्हा होणार नाही....!
प्रतिनिधी