नसीर शिकलगार --फलटण--लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याने गाळपास आलेल्या उसाला पहिला हप्ता १८०० रुपये दर देऊन ऊसदराची कोंडी फोडली आहे. आता इतर कारखाने काय दर देणार? याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. पहिली उचल रोख स्वरूपात मिळाल्याने ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता अंतिम दर उच्चांकी निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत.जिल्ह्यात उसाचे उत्पादन प्रचंड होत असते. फलटण तालुक्यातील काही भागात सतत दुष्काळ असला तरी बागायत पट्ट्यात पूर्णपणे उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दरवर्षी पंधरा ते सोळा लाख मेट्रीक टन उसाचे उत्पादन होत असते. तालुक्यात यापूर्वी दोन कारखाने असल्याने हे दोन्ही कारखाने उसाचे संपूर्ण गाळप करून शकत नव्हते. पर्यायाने ऊस उत्पादकांना शेजारील पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस देण्याशिवाय पर्याय नव्हता. बाहेरील कारखाने ऊस उत्पादकांची किरकोळ दर देऊन बोळवण करत होते. ऊस उत्पादक शेतकरी अशा कात्रीत सापडला असताना तालुक्यात आणखी दोन खासगी कारखाने निघाले. त्यातील लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर कारखान्याने कारखाना यावर्षी चालू करताना रणजितसिंहांनी ऊस उत्पादनकांना चांगला दर देण्याचा शब्द दिला होता. या कारखान्याने पहिला हप्ता रोख स्वरूपात कोणतीही कपात न करता थेट स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना दिल्याने ऊस उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.बाहेर गाळपासाठी जाणाऱ्या उसाचे प्रमाण कमी झाले आहे. लवकरच दुसऱ्या खासगी कारखान्याचेही गाळप सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांची दरासाठी बाहेरील कारखानदारांकडून होणारी अवहेलना थांबणार आहे.लोकनेते कारखान्याने १८०० रुपयांचा पहिला हप्ता देत पहिल्या उचलीची कोंडी फोडली आहे. त्यामुळे इतर कारखाने आता पहिली उचल काय देणार? याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. ‘लोकनेते’मुळे इतर कारखान्यांनाही आता स्पर्धेत राहण्यासाठी दराची घोषणा करावी लागणार आहे. त्यात ‘लोकनेते’चे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी इतर कारखान्यांपेक्षा जादा दर देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा व बाजारपेठेत साखरेचे वाढत चाललेले दर पाहता इतर कारखान्यांनाही आता दराच्या स्पर्धेत उतरावेच लागणार आहे. एखाद्या कारखान्याने कमी दर दिला तर तो कारखाना भविष्यात अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे स्पर्धा लागणार आहे. मागील हंगाम ऊस उत्पादकांसाठी अडचणीचा गेला. कमी दरामुळे अनेकांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. या परिस्थितीत या हंगामात दराची स्पर्धा वाढणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. ‘श्रीराम’, ‘न्यू फलटण’ने जादा दर द्यावा ‘लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर कारखान्याने पहिला हप्ता १८०० रुपये देऊन ऊसदराची कोंडी फोडली आहे. त्यामुळे तालुक्यतील श्रीराम सहकारी साखर कारखाना व न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्यानेही वाढलेले साखरेचे दर पाहता पहिला हप्ता अठराशे किंवा त्यापेक्षा जादा द्यावा. अन्यात आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागणार आहे. अंतिम दरासंदर्भातही लवकरच भूमिका जाहीर केली जाईल,’ अशी माहिती फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘लोकनेते’ने फोडली कोंडी; आता इतरांकडे लक्ष!
By admin | Published: December 15, 2015 9:37 PM