सातारा: विठुरायाच्या भेटीची आस मनात घेऊन पंढरीच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा शनिवारी (दि. ६) सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघी लोणंदनगरी सजली असून, जिल्हा प्रशासनदेखील सज्ज झाले आहे.
ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याला परंपरेची किनार आहे. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी या सोहळ्यात निस्वार्थ भावनेने सहभागी होत असतात. आनंद अन् भक्तीचा हा अनुपम सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. पंढरीच्या दिशेने निघालेला वैष्णवांचा हा मेळा शनिवारी महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हेनगरीचा निरोप घेऊन साताऱ्यात दाखल होणार आहे. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड असा विसावा घेत हा सोहळा दि. ११ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी लोणंदनगरी सज्ज झाली असून, प्रशासनाकडून माउलींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी मौजे पाडेगांव येथे स्वागत मंडप उभारण्यात आला आहे. तसेच पालखी विसावा, पालखी तळावरील झाडे-झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. पालखी महामार्गावरील खड्डे, साईडपटटया तसेच पालखी तळावर मुरुम टाकून वारकऱ्यांची वाट सुकर करण्यात आली आहे. वारकरी व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस दलाची यंत्रणा सज्ज झाली आहे. महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग आणि गृह विभागातील एकूण ३ हजार १३२ अधिकारी व कर्मचारी यांची या सोहळ्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याचा कार्यक्रम असामाऊलींचा पालखी सोहळा दि. ६ व ७ रोजी लोणंदनगरीत विसावणार आहे. यानंतर सोमवार, दि. ८ रोजी दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगांव येथे होणार आहे. मंगळवार, दि. ९ जुलै रोजी काळज, निंभोरे, वडजल असा पाहुणचार घेत हा सोहळा फलटण विमानतळावर विसावा घेईल. बुधवार, दि. १० रोजी सकाळी विडणी, पिंपरद, निंबळक फाटा मार्गे बरड येथे मुक्कामी जाईल. गुरुवार दि. ११ जुलै रोजी बरड येथून हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.