लोणंद : लोणंद बाजार समिती आवारात भरविल्या जाणाऱ्या बकरी बाजारात सोशल डिस्टन्सचे पालन न झाल्याने तहसीलदार दशरथ काळे व लोणंद नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी तो बंद केला.
लोणंद बाजार समिती आवारात प्रत्येक गुरुवारी बकरी बाजार भरविण्यात येतो. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात झालेल्या बकरी बाजारात प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने लोणंद नगर पंचायतीने बकरी बाजार बंद करावा, असे आवाहन बाजार समितीला केले असतानाही या गुरुवारी बाजार भरविण्यात आला होता. या बाजारात अनेक जिल्ह्यांतून व परराज्यातून अनेक व्यापारी बकरी खरेदी करण्यासाठी येत असतात. खंडाळा, फलटण, पुरंदर, कोरेगाव तालुक्यातील शेकडो मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढया विकण्यासाठी बाजारात येतात. बकऱ्या विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून लोणंदच्या व्यापारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करतात. यामुळे कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता असल्याने बकरी बाजार बंद करण्यासाठी खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, लोणंद नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले, लोणंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सकाळी सात वाजता बाजार बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, आवाहन करूनही बाजार बंद होत नसल्याने शेवटी स्वतः तहसीलदारांना हातात दांडका घ्यावा लागला. पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत बाजार आवार मोकळे करून मुख्य प्रवेशव्दार सील केले.
प्रशासनाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे शेतकरी, व्यापारी, खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या नागरिकांची पळापळ सुरू झाल्याने अनेक व्यापाऱ्यांची दैना उडाली. अनेकांच्या शेळ्या - मेंढ्या या गोंधळात हरवल्या. शेकडो वाहने बाजार समितीमधून बाहेर काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. भर पावसात मेंढपाळ, शेतकरी व व्यापाऱ्यांची पळापळ सुरू होती. बाजार अचानक बंद केल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेकांनी आपल्या शेळ्या-मेंढया मिळेल त्या भावात विकून पळ काढला.
चौकट
बाजार समितीने पूर्वसूचना दिली असती तर आम्ही बाजारात आलोच नसतो, अशी भावना व्यापारी व्यक्त करत होते. अचानक बाजार बंद केल्याने झालेल्या गोंधळात अनेक व्यापाऱ्यांनी गरजू मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढया निम्म्या किमतीत घेतल्या.
कोट
वारंवार पूर्वसूचना देऊनही बाजार समिती आवारात भरवल्या जाणाऱ्या बकरी बाजारात सामाजिक अंतर न पाळल्याने शेवटी हे पाऊल उचलावे लागले. आता पुढील आदेश येईपर्यंत बाजार समितीचे प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे.
हेमंत ढोकले, मुख्याधिकारी, लोणंद नगर पंचायत