सातारा : राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध आगारांतून लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देशलाही गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होत होती. गाड्या अशाच सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
०००००००
श्वानांचा उपद्रव
सातारा : सातारा शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. राजपथ, खालचा रस्ता, जुना मोटार स्टॅण्ड परिसरात श्वान झुंडीने फिरत असतात. रात्री दुचाकीस्वारांचा ते पाठलाग करतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. अन्यथा जखमी होण्याचे प्रमाण वाढू शकते.
०००००००००
तोंडावर मास्क लागले निघायला
सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रयत्न सुरू केले. याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने तोंडावर मास्क लावण्याची सक्ती केली. त्याला सातारकरांनी सुरुवातीला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आता कोरोनाची धास्ती कमी होत असल्याने मास्क वापरण्याचे टाळले जात आहे. भरचौकात अनेक जण विनामास्क फिरताना दिसतात.
००००००००
...पण स्कूल बस बंदच
सातारा : जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे स्कूल बसचालकांना दिलासा मिळेल, असे वातावरण झाले होते. मात्र, अनेक शाळांनी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांनी पर्यायी सोय केली आहे. त्यामुळे स्कूल बस बंद अवस्थेत आहेत.
००००००००
मुलांना वेध परीक्षेचे
सातारा : जिल्ह्यात सर्वच इयत्तेचे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यामुळे आता कधी वार्षिक परीक्षा होतात याकडे लक्ष लागले आहे. यादृष्टीने पालक मुलांकडून अभ्यास करून घेत आहेत. मात्र नक्की किती अभ्यासक्रम असेल, याचीच खात्री नसल्याने त्यांच्यामध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तरी परीक्षेचे वेध लागले आहेत.
००००००००००
आठवडा बाजारातही काळजी घेण्याची गरज
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजार बंद करण्यात आला होता. तो आता पुन्हा सुरू होत आहे. मात्र, बाजारात येणारे शेतकरी व ग्राहकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, तरीही विनामास्क फिरणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
००००००००
पाणीसाठे आटले
सातारा : जिल्ह्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने पाणी चांगले असेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अनेक नदी, ओढ्यांचे पाणी आटले आहे. भूजल पातळीत घट होत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.
००००००
व्यवसाय पूर्वपदावर
सातारा : कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांचे लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसायांना फटका बसला होता. मात्र, आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापारी, कामगारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, महामारी कायम असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
०००००००
पोलिसांविरोधात रिक्षाचालकांची तक्रार
सातारा : वाहतूक नियंत्रण पोलीस हे सर्व वाहनधारकांना वेठीस धरून त्यांच्याकडून अमाप दंड वसूल करत असतात. तसेच वाहनधारकांचे वयमान न बघता कसेही अरे-तुरे बोलत असतात. वाहतूक पोलीस हे गजवडी फाटा, नुणे, लिंब, चिंचनेर, संगम नगर, पाटखळ माथा येथे कारवाई करतात. त्यामुळे त्यांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
०००००
तपासणी बंद
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढत असतानाही दुकानांमध्ये येणाऱ्यांचे तापमान पाहिले जात होते. त्यानंतरच दुकानात ग्राहकांना सोडले जात होते. मात्र आता ही तपासणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
००००
यात्रा साध्या पद्धतीने
सातारा : जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांना प्रारंभ झाला आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने साध्या पद्धतीने यात्रा साजऱ्या केल्या जात आहेत. घरच्या घरी कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यामुळे यात्रेनिमित्ताने पैपाहुणे, मित्रांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या जेवणावळ्या बंद झाल्या आहेत.