सातारा : बहीण-भावाचं नातं अन् प्रेम वृद्धिंगत करणारा रक्षाबंधनाचा सण रविवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. बहिणीने आपल्या लाडक्या भाऊरायाचे औक्षण करून त्याला राखी बांधली, तसेच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनादेखील केली. रक्षाबंधनामुळे ठिकठिकाणच्या बाजारपेठा गर्दीने गजबजून गेल्या होत्या.
रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाची चाहूल लागल्यापासून जिल्ह्यासह साताऱ्याची बाजारपेठ विविध प्रकारच्या भेटवस्तू व राखींनी गजबजून गेली होती.
संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने शहरातील कापड, सराफा, भांडी, मोबाईल, तसेच इतर दुकानांत गर्दी दिसून आली. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन करून भरभरून खरेदी केली. ज्या बहीण-भावांना भेटता आले नाही त्यांनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, तर भाऊरायाने आपल्या लाडक्या बहिणीला ऑनलाईन भेटवस्तू पाठवून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला.
(चौकट)
सोशल मीडियावर शुभेच्छांंचा वर्षांव
रक्षाबंधन साजरा केल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर शुभेच्छांचा अक्षरश: महापूर उसळला. कोणी आपल्या लाडक्या बहिणीचे औक्षण करताना, राखी बांधताना, तर कोणी मिठाई भरवतानाचे फोटो शेअर केले. ज्यांना रक्षाबंधाला येता आले नाही, अशा बहीण-भावांनीदेखील सोशल मीडियावर रक्षाबंधाचे जुने फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या.
(चौकट)
विद्यार्थ्यांशी ऋणानुबंधाचे नाते
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजनेच्या वसतिगृहात रक्षाबंधन उत्साहात साजरा झाला. साताऱ्यातील अरविंद देशमुख हे अनाथ होते. त्यांचं सर्व शिक्षण हे येथील वसतिगृहातच झाले. त्यामुळे अरविंद देशमुख यांनी पत्नी अरुणा यांच्यापुढे कमवा व शिका योजनेच्या मुलांना राखी बांधण्याची कल्पना सुचविली आणि दोघांनीही १९८५ पासून हा उपक्रम सुरू केला. गेल्या ३७ वर्षांपासून या कुटुंबीयाने विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध जपले आहेत.
फोटो : २२ जावेद खान