राहिद सय्यद - लोणंद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या वारीची ओढ अवघ्या जिल्ह्याला लागली आहे. वैष्णवांच्या मेळ्याचे स्वागत नीरा नदीतीरावर केले जाते. तसेच वारीतील पहिले आणि एकमेव अभ्यंगस्नान नीरा नदीपात्रात होते. वारकऱ्यांसाठी ही अनोखी पर्वणी असते. मात्र, नदीकिनारी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाने स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे. माउलींच्या भक्तीचा सागर अवघा महाराष्ट्र डोळे भरून पाहत असतो. मात्र, या पवित्र जागेवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एरवी नदीकिनारी घाटावर अंत्यसंस्कार तसेच सावडण्याचे विधी होत असतात. त्याचे सर्व साहित्य तेथेच पडलेले असते. माउलींच्या रथाचे नीरा नदीच्या जुन्या पुलावरून सातारा जिल्ह्यात आगमन होते. पालखी रथ थांबवून अभ्यंगस्नानासाठी माउलींच्या पादुका रथातून हातावर घेऊन नदीपात्रात नेल्या जातात. या रस्त्याने माउलींच्या पादुका नदीपात्रात नेल्या जातात तो रस्ता उताराचा आणि खड्डेमय झाला आहे. पुरेसे अनुदान मिळावे...लोणंदमध्ये पालखी सोहळ्याचा मुक्काम अडीच दिवसांचा असतो. सर्व वारकऱ्यांना सुविधा पुरविणे फार जिकिरीचे असते. स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालय, जंतुनाशक फवारणी या सर्व बाबी सांभाळणे ग्रामपंचायतीस कठीण जाते. पालखी विसाव्यासाठी शासन ग्रामपंचायतीस जे अनुदान देते ते पुरेसे होत नाही. याकडेही लक्ष द्यायला हवे. तीर्थक्षेत्र निधीची घोषणा हवेत...तत्कालीन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी नीरा घाटावर तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्या प्रस्तावाचा अजून एकही रुपया तीर्थक्षेत्राला मिळाला नाही. तसेच लोणंद पाणी पुरवठा केंद्रावरून वाल्हे ते फलटण पालखीचे मुक्काम असेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा केला जातो. तेथे वीज कनेक्शन एक्स्प्रेस फिडर मंजूर व्हावा, अशी मागणी होत आहे.पालखीतळाची जागा वाढवून द्यावीश्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी लोणंद येथील तळ अपुरा पडत आहे. यासाठी सध्याच्या तळाच्या पाठीमागील जागा पालखी तळास द्यावी किंवा नवीन जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालखी सोहळा विश्वस्त व ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली आहे.
लोणंदचा पालखीतळ समस्यांच्या गर्तेत
By admin | Published: June 22, 2015 10:24 PM