दरम्यान, सध्या कालव्याला पाणी असल्याने दुर्घटना घडल्यास कालव्यात बुडून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. कालवा भरून वाहत असल्याने धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे हा भराव तत्काळ दुरुस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सैदापूर गावाला जोडणारे अनेक रस्ते आहेत. त्यापैकी कृष्णा कालव्याच्या भरावावरून जाणारा एक रस्ता आहे. जवळचा मार्ग म्हणून या रस्त्यावर मोठी रहदारी असते. तसेच या परिसरातील ऊसाची वाहतूकही याच रस्त्यावरून होत असते. याच रस्त्यावरून पुढे गेल्यावर ‘आय लव्ह सैदापूर’ हा सेल्फी पॉईंट तयार केला गेला आहे. तसेच सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांची मैदाने खेळण्यासाठी आणि बंद असल्याने याच रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी लोक व्यायाम करीत असतात. सकाळी तर या रस्त्यावर मॉर्निग वॉक करणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे हा रस्ता चांगला वर्दळीचा बनला आहे.
सध्या या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर समस्यांनी ग्रासले आहे. ज्या भरावावरून हा रस्ता जातो तो अनेक ठिकाणी खचला आहे. काही ठिकाणी तर तो एवढा खचला आहे की, अर्धा रस्ता गायब झाला आहे. त्यातच गवत आणि वाढलेल्या झुडुपांमुळे हा खचलेला भाग दिसून येत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. शेतातील ऊसही या रस्त्याने बाहेर काढला जातो तेव्हा खूपच भीतिदायक अनुभव येत असतो. त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊन जीवित हानी होण्याअगोदर हा रस्ता दुरूस्त केला जावा, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर पूर्वेच्या बाजूला पिचिंगचे काम सुरू झाले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते बंद झाले ते बंदच आहे. तरी तत्काळ या भरावाचे अस्तरीकरण करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
- चौकट
‘मॉर्निंग वॉक’साठी होते गर्दी
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती आहे. ‘आय लव्ह सैदापूर’ हा सेल्फी पॉईंट असून रस्त्याचे सुशोभिकरणही केले आहे. कृष्णा नदीचे दिसणारे विहंगम दृश्य आणि खोडशी धरणाचा साठा यामुळे सकाळी व संध्याकाळी या रस्त्यावर फिरायला जाणाऱ्यांची गर्दी असते. दुचाकीही ये-जा करीत असतात. त्यामुळे अगोदरच लहान असणारा हा रस्ता खचल्याने आणखी लहान बनला आहे.
फोटो : २०केआरडी०१
कॅप्शन : सैदापूर येथे भराव खचल्याने रस्त्यावरील वाहतूक आणि रहदारी धोकादायक बनली आहे.