सातारा , दि. १९ : एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा भलताच लाभ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी घेतला आहे. एसटीची चाके थांबल्याचा फायदा उठवत चक्क चौपट भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जात आहे. कऱ्हाडातून साताऱ्यात यायला ५८ रुपये भाडे आहे, तेच आता २00 वसूल केले जात आहेत.
एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा भोग दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, व्यवसायिक त्याचबरोबर सणानिमित्त गावी परतणाऱ्या चाकरमान्यांच्या पाठीमागे लागला आहे. दिवाळीत कुटुंबीयांसोबत आनंद घ्यायचा, असे अनेकांचे नियोजन असते. दिवाळीच्या बोनसचे पैसे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी वापरायचे, असे अनेकांनी ठरवलेले असते. पण त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होताना पाहायला मिळत आहे.
प्रवासी वाहतूक वाहन चालकांनी आपला दर भलताच वाढवला आहे. कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यावर ही खासगी वाहने थांबलेली असतात. प्रवाशांचीही याठिकाणी मोठी गर्दी असते. पुणे, सातारा, मुंबईकडे जाण्यासाठी थांबलेल्या या प्रवाशांना इच्छित स्थळी वेळेत पोचायचे असल्याने ही मंडळी आधीच तणावात असतात. त्यात महामार्गावर इतर वाहनेही थांबता थांबत नाहीत, मग पर्याय उरतो, तो खासगी प्रवासी वाहतुकीचा!
पण साताऱ्यासाठी २00 रुपये आणि पुण्यासाठी १२00 रुपये असे दर आकारले जात असल्याने प्रवाशांचा खिसा मोकळा होताना पाहायला मिळत आहे. भाऊबीज सणात प्रवासाशिवाय पर्याय नसतो. साहजिकच पैशांची लूट थांबण्यासाठी प्रवाशी एसटी कर्मचाऱ्याचा संप थांबण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत.