सातारा : कोयना नदी पात्रासह आजूबाजूच्या ओढ्यामधील पाणी कमी होताच टपून बसलेल्या ट्रॅक्टर व्यावसायिकांनी नदी, ओढ्यातील वाळूची लूट सुरू केली आहे. या प्रकाराकडे लक्ष देण्यासाठी स्थानिक प्रशासनकडे वेळ नाही आता या चोरट्या वाळूउपसा करणाऱ्यावर कारवाई होणार का? वारंवार या परिसरात होत असलेली ही चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी प्रशासन उपाययोजना करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.पावसाळा संपला की नदीसह ओढ्याचे पाणी कमी होत असते. प्रत्येक पावसाळ्यात कोयनेच्या प्रवाहाने निसरे पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होत असतो. हा वाळूसाठा नदीचे पाणी कमी होताच परिसरातीलच काही वाळू व्यावसायिकांचा या वाळूवर डोळा असतो. ही वाहतूक रात्रीच्या वेळी सर्रास होत असते. गेल्याच महिन्यात कोयना नदीचे पाणी कमी झाल्याने नदी पात्र कोरडे पडले होते. पात्र कोरडे पडल्याने वाळूसाठा दिसत असल्याने चोरटा वाळूउपसा झाला होता. प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. चालू वर्षाचे वाळू टेंडरचे लिलाव होण्याअगोदर बांधकाम व्यावसायिकांचा या नदीतल्या वाळूवर सर्रास डोळा असतो. सोनाईचीवाडीसह नावडीच्या हद्दीतील गाखडे येथील ओढ्यातील वाळूउपसा सुरू आहे. रात्रीच्या वेळी ही वाहतूक केली जात आहे. परंतु, सामान्य प्रशासन मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या चोरट्या वाळू व्यावसायिकावर कारवाई करावी लागत अशी मागणी या परिसरातून होत आहे. निसरे पुलाखाली सुद्धा वाळूची तस्करी होत आहे. (प्रतिनिधी)तहसीलदारांनी अचानक छापे टाकावेमारुल हवेलीसह निसरे बहुले सोनाईचीवाडी, गाखडे, नावडी या परिसरातही वाळूची तस्करी केली जात आहे. मात्र काही अधिकारी व वाळूूूमाफीयांचे लागेबांधे असल्यामुळे अशा प्रकाराकडे सोयस्कर दुर्लक्ष केले जात आहे. तहसीलदारांनी अचानक छापे टाकल्यास या प्रकरणातील सर्व सत्य बाहेर येईल. अनेक नागरिकांनी वाळू तस्करांना अटकाव केला. मात्र त्यांच्या दहशतीमुळे वाळू माफीया मोकाट सुटले आहेत.
कोयना नदीपात्रात वाळूची लूट
By admin | Published: November 02, 2014 9:10 PM