फलटण : शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी बँकेतून काढलेल्या कर्जाची आठ लाख रुपये रोकड घरी घेऊन जात असताना दोन चोरट्यांनी पैशाची पिशवीच लंपास केली. पैशांचे पुडके पडल्याचे सांगत या चोरट्यांनी फलटणच्या चौकात शेतकऱ्याला फसविले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विलास करचे (रा. पिंपळी, नातेपुते जि. सोलापूर) यांनी शेतातील पाईपलाईन व इतर कामांसाठी आठ लाखांचे कर्ज एकाबँकेतून काढले. धनादेशाऐवजी आठ लाखांची रोकड घेऊन ते शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास पंढरपूर रस्त्याकडे निघाले होते. क्रांतिसिंह नाना पाटील चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ‘तुमचे पैशांचे पुडके मागे पडले,’ असे सांगितल्यावर करचे यांनी त्यांच्याकडील दुचाकी थांबवून मागे पाहिले. पैशांचे पुडके व नोटा पडल्याचे दिसल्यावर गाडी उभी करून ते पैसे गोळा करायला धावले. त्यावेळी आजूबाजूचे लोकही मदत म्हणून पैसे गोळा करायला आले. या वेळेतच दोघा चोरट्यांनी करचे यांच्या गाडीच्या हँडलला लावलेली आठ लाखांची रक्कम असलेली पिशवी काही क्षणात पळवून नेली. रस्त्यावरील पैसे गोळा केल्यावर करचे यांचे लक्ष पिशवीकडे गेले असता पिशवी व ते दोघे गायब असल्याचे लक्षात आले. तसेच रस्त्यावर पडलेले पैसेही त्यांचे नसल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली असता अनेकांनी चोरटे कोठे गेले बघितले; पण ते गायब झाले होते. पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी करून शोधाशोध केली; परंतु ते सापडले नाही. याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हातचे सोडून पळत्याच्यामागे लागल्याने नुकसानकरचे यांनी आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चांगली असून, पैसे पॅक करून गाडीच्या हँडलला अडकवली होती. पैसे नेताना सोबतीला कोणाला तरी आणणे गरजेचे होते. तसेच धनादेशाऐवजी रोकडचा आग्रह धरल्याने बँकेने रोख आठ लाख रुपये दिले. पैसे पडल्याचे चोरट्यांनी सांगितले, तेव्हा हँडलची बॅग सोबत नेणे किंवा बॅग फाटलेली आहे का, हे तपासणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता रस्त्यावर पडलेल्या पैशांच्या आमिषाने त्यांनी हातातले पैसेही गमाविले, तर चोरट्यांनी आठ लाख कमावल्याची चर्चा सुरू होती.
शेतकऱ्याला आठ लाखांना लुटले
By admin | Published: July 22, 2016 11:09 PM