सातारा : गाडीला धक्का लागल्याचे निमित्त मिळाल्याने साथीदारांना बोलावून दोन ट्रकचालकांना (चासी) दिवसभर निर्मनुष्य ठिकाणी ठेवून बेदम मारहाण करण्यात आली. चासीचालकांकडून ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेल्याप्रकरणी सात संशयितांना तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासांत गजाआड केले. पाटखळ माथा ते शिवथरचा माळ या परिसरात मंगळवारी ही घटना घडली.अमोल हणमंत गायकवाड (वय २८, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव), अभिजित मधुकर पवार (२२, रा. जळगाव, ता. कोरेगाव), योगेश वसंत महामुनी (२४, रा. देगाव पाटेश्वर, ता. सातारा), सूरज हणमंत मोरे (२५, रा. रेवडी, ता. कोरेगाव), भरत कृष्णा अभिगार (२०, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव, मूळ रा. अगरखेड, ता. इंडी, जि. विजापूर), सुनील प्रकाश जाधव (२३, रा. जळगाव, ता. कोरेगाव) आणि केतन जनार्दन सावंत (२५, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. चासीचालक नितीन राजाराम पाटील (वय ४४, रा. काझी गढी, कुंभारवाडा, नाशिक) यांनी याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यासह नाशिकला त्यांच्या शेजारीच राहणारे एकनाथ सुखदेव जाधव (वय ५६) यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.होसूर (तमिळनाडू) येथून ट्रकच्या तीन चासी आळंदी (जि. पुणे) येथे निघाल्या होत्या. साताऱ्याच्या पुढील प्रवास लोणंदमार्गे करण्याचे ठरल्याने हे तिघे त्या दिशेने निघाले. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पाटखळ माथ्याजवळ (ता. सातारा) समोरून येणारी मोटार (एमएच ११ बीएच ८६४२) एका चासीच्या अगदी जवळून गेली. चासीच्या मागील बाजूचा धक्का लागल्याने मोटारीचा टायर फुटून थोडे नुकसान झाले. चासीचालक नितीन पाटील यांनी चासी रस्त्याकडेला थांबविली.मोटारचालक अमोल गायकवाड याने त्यांना चासीतून खाली उतरवून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. थोड्याच वेळात २५ ते ३० जण तेथे जमले. त्यांनी पुन्हा पाटील यांना बेदम मारहाण केली.दरम्यान, पुण्याकडे निघालेल्या तीनपैकी एक चासी पुढे निघून गेली होती, तर एकनाथ जाधव यांच्या ताब्यात असणारी चासी घटनास्थळीच थांबली होती. जमावाने या दोन्ही चासीचालकांना शिवथरच्या दिशेने नेले. पुढे-मागे दुचाकी गाड्या होत्या. दोन्ही चासी मुख्य रस्त्यावर ठेवून पाटील व जाधव यांना आडमार्गाला नेण्यात आले. तेथे दिवसभर जमावातील लोक त्यांना मारहाण करीत होते.‘चासीचे मालक तमिळनाडूतील असून, त्यांच्याकडून नुकसान भरपाईबाबत बोला; पण मारू नका,’ असे हे दोघे सांगत होते. मात्र, मालकांशी संपर्क करूनही तिढा न सुटल्याने मारहाण सायंकाळी सहापर्यंत सुरूच राहिली. नंतर भरपाई म्हणून चासीचे काही सुटे भाग संशयितांनी मागितले. दोन्ही चासीच्या स्टेपनी जाधव आणि पाटील यांनाच काढायला लावल्या. टूलबॉक्स ताब्यात घेतल्या. तसेच पाटील यांच्या खिशातील ३ हजार ५०० आणि जाधव यांच्या खिशातील ५ हजारांची रोकडही काढून घेतली. नंतर एक-एकजण तेथून निघून गेला. पाटील व जाधव तेथून वाठारच्या दिशेने गेले. ‘पोलीस ठाणे कुठे आहे,’ अशी विचारणा करताच वाठार ग्रामस्थांनी त्यांना सातारा तालुका पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. रात्री उशिरा हे दोघे तालुका पोलीस ठाण्यात पोहोचले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. (प्रतिनिधी)पोलिसांचा रात्रभर शिताफीने तपास तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह टीमने रात्रभर शिताफीने तपास केला. संशयिताच्या मोटारीचा क्रमांक फिर्यादी सांगू शकला नव्हता. गाडी सिल्व्हर रंगाची होती, एवढेच सांगितले होते. या रंगाची टायर फुटलेली गाडी दुरुस्तीसाठी कोणत्या गॅरेजला लागली आहे, हे पोलिसांनी शोधून काढले. नंतर गाडीचा मालक आणि नंतर साथीदार अशी क्रमाक्रमाने धरपकड रात्रभर सुरू होती. सकाळी नऊपर्यंत सात संशयितांना पकडण्यात आले. न्यायालयाने सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव तपास करीत आहेत.स्टेपनी काढताना चित्रीकरणसंशयितांनी आपल्याला दोन्ही चासीच्या स्टेपनी आणि टूलबॉक्स काढायला लावल्या, तेव्हा त्यांच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घेतले, असे फिर्यादी पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. दुपारी एक ते सायंकाळी सहापर्यंत प्रत्येकजण अधूनमधून आपल्याला मारहाण करीत होता आणि ऐवज काढून घेतल्यावर एक-एक करून जमावातील लोक निघून गेले, असेही त्यांनी सांगितले आहे.
ट्रकचालकांना बेदम मारून लुटले
By admin | Published: January 14, 2016 11:44 PM