सातारा : महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीतील पाच जणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित संशयितांकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.तेजस संतोष शिवपाल, आदित्य दीपक कुचेकर, विशाल नारायण बडेकर, विकी नारायण बडेकर व सचिन शहाजी लोंढे (सर्व रा. सदरबझार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीला अटक करण्याबाबतच्या सूचना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभाग या टोळीचा शोध घेत होता. त्यामध्ये त्यांनी एकाला ताब्यात घेतले.
चौकशीमध्ये त्याने महामार्गावर लोकांना अडवून जबरी चोरी करत असल्याची कबूली दिली. त्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, घड्याळ व दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.निखील सुरेश कापूरकर (वय २४, मुळ रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड, सध्या रा. मोतोश्री पार्क डिमार्डजवळ, सातारा) तसेच चिराग रामचंद्र सकुंडे (रा. अंबवडे सं. वाघोली, ता. कोरेगाव) या दोघांना मारहाण करून संबंधितांनी लुटल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या टोळीकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सतीश पवार, सागर निकम, संदीप कुंभार, नितीराज थोरोत यांनी ही कारवाई केली.