कुडाळ : हॉटेल आराम आणि एकूणच तिथल्या भल्यामोठ्या पसाऱ्याचे मालक म्हणजे, विजय यादव तथा बापू. साहित्य, कला, उद्योग या क्षेत्रातील विचारांचा महासागर म्हणजेच बापू. कलाक्षेत्रापासून ते विविध क्षेत्रांची खडान्खडा माहिती असणारे बापू म्हणजे एक कादंबरी होय. आपले संपूर्ण आयुष्य पूर्ण प्रॅक्टिकल जगणाऱ्या विजय यादव बापू यांनी हॉटेल आराम व पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र निर्माण केले. या उद्योग समूहाचे आधारवड, कामगारांचा बापमाणूस यांचे निधन होऊन आज दहा दिवस पूर्ण झाले असून, याबाबत सर्वसामन्यांमध्ये खंत व्यक्त केली जात आहे.
बापूंच्या अचानक जाण्याने कोणालाच विश्वास बसत नाही. बापमाणूस हरपला. अनेकांचा आधारवडच कोसळला अशा भावना त्यांच्या जाण्याने अनेकांनी व्यक्त केल्या. बापूंना भेटणारा प्रत्येक माणूस त्यांच्या प्रेमात पडायचा. त्यांच्या बोलण्यावर, अदाकारीवर फिदा व्हायचा. जुन्या चित्रपटसृष्टीतील तसेच मुंबईच्या घालविलेला कारकिर्दीबाबत आणि राजकारणातील खळबळजनक गप्पा ऐकाताना बापूंच्या अनेक अनुभवाची जंत्रीच अनुभवता येत होती.
निळू फुले यांचे निधन झाले होते, त्यांच्याशी बापूंचा छान स्नेह, निळू फुले अभिनेता आणि त्याचसोबत चळवळीतील कार्यकर्ते म्हणून विजयराव बापू नेहमी सांगायचे. बापूंनी आराम उद्योग समूह व पिंजरा कला केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या समोरच निळू फुले यांचा फोटो लावून त्याखाली लिहिलं मोठा माणूस. या महान कलाकाराच्या बाबतीत असणारा प्रेम महामार्गावरील येणारा जाणारा प्रत्येकजण आवर्जून पाहत आणि फोटो लावणाऱ्याबाबत त्यांना कुतूहल वाटायचे.
या भल्या माणसाचा गरजूला मदत करताना हात कधीच आखडला नाही आणि दुर्जनाला धडा शिकवायलाही हात कधी कचरला नाही.. भीती हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच.. कुणाशीही भिडायची तयारी असायची.. त्यांचा या जगाचा अनुभव अफाट या शब्दापलीकडचा होता. निराधार माणसंच काय पण इमू पालनाचा धंदा गोत्यात गेल्यावर लोकांनी रस्त्यावर सोडून दिलेले इमूही त्यांनी सांभाळले. हे पक्षी रस्त्यावर बावरलेले पाहून हेलावलेले बापू पाहणं काळजाला पीळ पाडणारं होतं. एकंदरीत त्यांच्याकडे पाहिलं तर कोणी म्हणणार नाही, कोणाच्या लक्षात पण येणार नाही एवढं अफाट व्यक्तिमत्त्व होतं बापू.. श्री. ना. पेंडसे यांच्या गारंबीच्या बापूतील बापूला अफाट बापू संबोधलं गेलं, त्या अर्थाने हे पण अफाट बापू. (वा .प्र.)